पुणे : गेल्या चार महिन्यांमध्ये कोरोनाच्या संकटामुळे कलाकार, तंत्रज्ञाचे प्रचंड हाल होताना पाहिले. ही सर्व हलाखीची परिस्थिती पाहताना मला मनापासून कळकळ वाट होती. त्यामुळे माझ्या कलाकार बांधवांसाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. अशावेळी मला ज्याक्षणी राष्ट्रवादीकडून विचारण्यात आलं तेव्हा मी क्षणाचाही विलंब न करता होकार दिला. कारण शरद पवार यांना कलाकारांची जाण आहे, ते कलाकारांची कदर करतात, त्यांची कला, साहित्य, सांस्कृतिक जाणीव आम्हाला माहिती आहे, असे उद्गार अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी काढले.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्यासह अनेक कलाकारांनी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
याकार्यक्रमात सिनेअभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्यासह राजेश सरकटे (गायक) , सुधीर निकम (लेखक,दिग्दर्शक), जितेंद्र जादुगार , सुवासिनी देशपांडे (अभिनेत्री ), शंकुतला नगरकर (लावणी कलावंत), सिध्देश्वर झाडबुके (सिने अभिनेता), विनोद खेडकर (सिनेअभिनेता), संतोष साखरे (कार्यकारी निर्माता) मिलिंद अष्टेकर( माजी उपाध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ ,कोल्हापूर), आशू वाडेकर(अभिनेता), संग्राम सरदेशुख (सिनेअभिनेता), उमेश दामले (सिने अभिनेते ),संजय डोळे (लेखक/दिग्दर्शक) ,ओंकार केळकर (संगीतकार) आदी कलाकारांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांसह अनेक चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते.
बेर्डे म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर खूप छान वाटतंय. आपल्या लोकांसाठी काम करण्याची इच्छा होती. फक्त चित्रपटसृष्टी नाही तर कलाकार, कलावंत, तत्रज्ञ, सर्वांसाठी मदत करण्याची इच्छा आहे. मागील चार महिन्यात कलाकार, तंत्रज्ञाचे प्रचंड हाल होताना पाहिले. मला मनापासून कळकळ वाट होती, या लोकांसाठी काहीतरी करावं अशी मनापासून इच्छा होती. त्यातूनही मी माझ्या श्रीमंत इंटरटेन्मेंटचं प्रोडक्शन हाऊस अंतर्गत मदत पोहचवण्याचा प्रयत्न केला मात्र पण ती मदत अपुरी होती.
फिजिकल डिस्टंसिंगचे तीन तेरा
प्रिया बेर्डे यांच्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला कार्यकर्ते आणि मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. त्यामुळे सभागृहात प्रचंड गर्दी झाली होती . जेव्हा सुळे ह्यांचे सभागृहात आगमन झाले त्यावेळी फिजिकल डिस्टंसिंगचे तीन तेरा वाजलेले पाहायला मिळाले.