खोरची बंदिस्त पाईपलाईन योजना कधी होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:10 AM2021-03-17T04:10:14+5:302021-03-17T04:10:14+5:30

रामदास डोंबे : खोर अनेक वर्षांपासून असलेली दुष्काळी समस्या... दुष्काळ आला की पाणी टंचाई... अनेक अस्वासनाची पूर्तता... वारंवार पाणी ...

When will the closed pipeline plan be made? | खोरची बंदिस्त पाईपलाईन योजना कधी होणार?

खोरची बंदिस्त पाईपलाईन योजना कधी होणार?

Next

रामदास डोंबे : खोर अनेक वर्षांपासून असलेली दुष्काळी समस्या... दुष्काळ आला की पाणी टंचाई... अनेक अस्वासनाची पूर्तता... वारंवार पाणी सोडण्यासाठी पाठपुरावा... हे प्रश्न आज पर्यंत कित्येक वर्षांपासून घर करून बसले आहेत.

दौंड तालुक्यातील खोर हे गाव उन्हाळा सुरू झाला की पाणी टंचाईच्या समस्यांच्या प्रश्नाला सामोरे जात असतो.

गेल्या कित्येक वर्षांपासून खोर येथील डोंबेवाडी पाझर तलावात पुरंदर जलसिंचन उपसा योजनेतून बंदीस्त पाईपलाईन योजना करून पाणी सोडण्याच्या संदर्भात पाठपुरावा केला जात आहे. मात्र या प्रयत्नांना आज पर्यंत यश आलेले नसून या पाणी योजनेचे घोडे नेमके कोठे आडून बसले आहे हे कळण्यास मार्गच उरला नाही.

पाणी योजनेच्या संदर्भात पुरंदर तालुक्यातील पोंढे शिव ते दौंड तालुक्यातील खोर मधील डोंबेवाडी पाझर तलाव हे अंतर ४.८ किमी असून या पाईपलाईन व्यास ५०० मिमी म्हणजे २० इंच इतका आहे. या कामाच्या बाबतीत सर्व्हेक्षण पूर्ण झाले असून जवळपास ४ कोटी ५० लाख रुपये योजनांचे काम हे आजही मंत्रालयात मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे.

आज खोरची ८० % शेती जवळपास ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. कार्यान्वित पुरंदर जलसिंचन योजना हे खोर येथील डोंबेवाडी पाझर तलावाच्याया अगदी उशाला आहे. मात्र कार्यक्षेत्र विषय जो पर्यंत मार्गी लागत नाही तो पर्यंत येथील शेतकरी वर्गाला पैसे भरूनच पाणी आणावे लागणार हे देखील तितकेच सत्य आहे.

--

चौकट :

कोट १

दौंड तालुक्याच्या पाणी योजनेच्या संदर्भात सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे काम थोडे प्रलंबित राहिले गेले आहे. संबंधित अधिकारी वर्गाशी बोलून लवकरच हे काम मार्गी लागणार आहे.

- राहुल कुल (आमदार, दौंड)

--

कोट २

या योजनेच्या कामाचे सर्वेक्षण पूर्ण झाला असून फाईल निधी अभावी मंत्रालयात पडून आहे. या बाबतीत अजून पर्यंत काहीच हालचाली पुढे झाल्या नाही.

-निलेश लगड (शाखा अभियंता, पुरंदर जलसिंचन योजना)

--

फोटो क्रमांक : १६ खोर जलयोजना

फोटोओळ : खोर (ता.दौंड) येथील डोंबेवाडी पाझर तलाव हा कोरडा पडला असून पुरंदर योजनेतून पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.

Web Title: When will the closed pipeline plan be made?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.