पूररेषा केव्हा होणार निश्चित ? साईनाथनगरच्या चारशे कुटुंबांना चार वेळा बसला पुराचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 12:55 PM2019-08-27T12:55:58+5:302019-08-27T12:57:46+5:30
साईनाथनगरची अद्यापही पूररेषा प्रशासनाने निश्चित न केल्यामुळे वर्षानुवर्षे साईनाथनगरमध्ये बांधकामे होत आहेत.
चंदननगर : गेल्या पंधरा दिवसांपूर्वी मुळा-मुठा नदीला पूर आला. त्यात वडगावशेरी-खराडी नदीकाठी असणाºया साईनाथनगरच्या चारशे कुटुंबांना याचा फटका बसला व कुटुंबांना स्थलांतरित व्हावे लागले. मूळ मुद्दा असा आहे, साईनाथनगरची अद्यापही पूररेषा प्रशासनाने निश्चित न केल्यामुळे वर्षानुवर्षे साईनाथनगरमध्ये बांधकामे होत आहेत. जर प्रशासनाने वेळीच साईनाथनगरची पूररेषा निश्चित केली असती तर बांधकामे झाली नसती व पर्यायाने सर्वसामान्य गरिबांना पुराचा फटका बसला नसता.
प्रत्येक वेळी येणाऱ्या पुरातून होणाऱ्या नुकसानाचे प्रशासनाकडून पुराचे पंचनामे केले जातात. मात्र, महत्वाचा मुद्दा म्हणजे या परिसराला नेहमी पुराचा मोठा फटका बसत आला आहे. सातत्याने पुराचा फटका बसत असल्यामुळे येथील सर्वसामान्य कुटुंबांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
मात्र यासाठी महापालिकेचे अधिकारी जबाबदार आहेत. यापूर्वी चार वेळा साईनाथनगरला पुराचा फटका प्रचंड बसला आहे. सर्वात जास्त फटका या वर्षी म्हणजे (गेल्या पंधरा) दिवसांपूर्वी आलेल्या पुराने बसला आहे. या पुरात घरातील सर्व साहित्य, वापराचे साहित्य धान्य कचऱ्यात टाकण्याची वेळ साईनाथनगरच्या पूरग्रस्तांवर आली. याबाबत ‘लोकमत’ने साईनाथनगरची प्रत्यक्ष पाहणी केली असता नदीपात्रात प्रचंड अतिक्रमणे झाली आहेत. यास महापालिका प्रशासन जबाबदार आहे. वेळीच जर साईनाथनगरची पूररेषा निश्चित केली असती तर निश्चितच बांधकामे झाली नसती व त्याचा फटका गोरगरिबांना बसला नसता, असे पाहणीत समोर आले.
यापूर्वी साईनाथनगरला १९९४ मध्ये पूर आला होता. मात्र त्यावेळी नदीपात्रालगत बांधकामे झाली नव्हती. त्यानंतर मुळा-मुठा नदी वहन क्षमता एक लाख क्युसेक असणे धरले आहे. यानंतर १९९७ मध्ये खडकवासला धरणातून ९0 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. यात साईनाथनगरच्या वीस घरांत पुराचे पाणी घुसले होते. यानंतर २00५ मध्येही पूर आला होता. या वेळी १२५ घरांत पुराचे पाणी घुसले होते.
त्यानंतर २0१४ मध्ये पूर आला होता . त्यावेळी १00 घरात पाणी घुसले होते. यावर्षी नदीपात्रालगत बांधकामे प्रचंड वाढल्यामुळे यावर्षी पंधरा दिवसांपूर्वी खडकवासला धरणातून ४७ ते ५० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग झाला व चारशे घरांत पुराचे पाणी घुसले.