अजित पवारांच्या अनुपस्थितीत पुण्याची धुरा गृहमंत्री तर बारामतीची जिल्हाधिकाऱ्यांच्या खांद्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 06:30 PM2021-06-26T18:30:09+5:302021-06-26T18:44:02+5:30
कोरोना आढावा बैठकीसह पोलिस, नगरपालिका आणि अन्य विकास कामांचा जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी घेतला आढावा...
पुणे : गेल्या दोन दिवसांपासून उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार नक्की कुठे आहेत, असाच प्रश्न पुणेकर आणि बारामतीकरांना पडला आहे. यामुळेच तर शुक्रवारची पुणे जिल्ह्याची कोरोना आढावा बैठक गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी तर शनिवारी बारामतीत कोरोना आढावा बैठक जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी घेतली.
अजित पवार यांचा दर आठवड्याच्या बैठकांचे नियोजन काही दिवस अगोदरच निश्चित होते. त्यानुसार शनिवार (दि.२६) रोजीच्या बारामती तालुक्यातील कोरोना आढावा बैठकीसह अन्य विविध बैठका व विकास कामांचा आढावा निश्चित झाला होता. परंतू, गेल्या काही दिवसातील राज्यातील विविध घडामोडीमुळेच पवार बैठकींना अनुपस्थित होते. पुण्याची बैठक वळसे-पाटील यांनी घेतली. पण बारामतीची बैठक कोण घेणार अशी चर्चा होती.
पुण्याचे जिल्हाधिकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विश्वासातील अधिकाऱ्यांपैकी एक अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यात गेल्या काही महिन्यांत जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी ज्या पध्दतीने जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती हातळली, रेमडेसिविरचा विषय असो की ऑक्सिजन, हाॅस्पिटलचे ऑडिट अत्यंत यसस्वी पणे सांभाळले. याशिवाय मेट्रोच्या जागेचा विषय, चांदणी चौकातील भूसंपादन, रिंगरोड, पुणे-नाशिक रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाला गती दिली आहे. यामुळेच अजित पवार यांचा विश्वास सार्थ केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारच्या बारामतीच्या कोरोना आढावा बैठकीसह पोलिसांच्या कामाचा आढावा, बारामती नगरपरिषदेच्या विकास कामांचा आढावा, पंचायत समितीच्या कामांचा आढावा, तालुक्यातील सार्वजनिक विकास कामांचा आढावा, महसूल विभागाचा आढावा, इतर विकास कामांचा आढावा घेतला. तर दुपारनंतर शंभर बेड्सचे माॅड्युलर हाॅस्पिटलच्या कामाची पाहणी, शासकीय मेडिकल काॅलेज, कऱ्हा नदी विकास प्रकल्प, कन्हेरी रोपवाटीका व शिवसृष्टी व शासकीय आयुर्वेद काॅलेज आदी विकास कामांची पाहणी देखील केली. डाॅ.राजेश देशमुख यांनी अजित पवार यांनी निश्चित केलेल्या सर्व आढावा बैठका व विकास कामांची देखील पाहणी पूर्ण केली.