- सुषमा नेहरकर-शिंदे पुणे : उद्यानांचे शहर म्हणून ओळख मिळविलेल्या पुणे शहरातील अनेक उद्यानांची सध्या दुरवस्था झाली आहे. खेळणी तुटली आहेत, साहसी खेळही दुरवस्थेमुळे व योग्य देखभाल व दुरुस्तीमुळे बंद पडले आहेत. मार्चअखेर व आचारसंहितेमुळे शहरातील सर्व उद्यानांमध्ये ठिकठिकाणी काँक्रीटची कामे, रंगरगोटी, लहान-मोठी बांधकामे सुरू आहेत. यामुळे सर्वत्र राडारोडा व कचऱ्याचे साम्राज्य दिसत आहे.सध्या दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असून, लवकरच प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा हंगाम सुरू होईल. त्यानंतर एप्रिल, मे महिन्यात उन्हाळी सुट्टी सुरु झाल्यावर शहरातील सर्व उद्यानांमध्ये बालगोपाळांची गर्दी सुरु होईल. याशिवाय राज्यापेक्षा पुण्यातील तापमान काही प्रमाणात कमी असल्याने संपूर्ण राज्यभरातून पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये शहरातील सर्वच उद्यानांमध्ये चांगलीच गर्दी असते. परंतु सध्या शहरातील अनेक उद्यानांची दुरवस्था झाली आहे. शहराच्या मध्यवस्तीत असलेले व अत्यंत जुने संभाजी उद्यानामध्ये मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र विभाग करण्यात आला आहे. परंतु येथे असलेल्या घसरगुंडी व दोरीवर चढणे यांसारखी काही खेळणी तुटली असून, यामुळे मुलांना दुखापत होऊ शकते. पालकमंत्री गरीश बापट यांच्या विकास निधीतून तब्बल २० लाख रुपये खर्च करून शनिवार पेठेत नदीकाठी बांधण्यात आलेल्या नाना-नानी उद्यानामध्ये काही विज्ञान खेळणी उभारण्यात आली आहेत. या खेळण्यांच्या देखभाल व दुरुस्तीकडे लक्ष न दिल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे. छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानामध्ये विविध प्राण्यांचे पुतळे बसविण्यात आले आहेत. परंतु येथे सुरू असलेल्या काँक्रीटच्या विविध कामांमुळे प्राण्यांचे पुतळे धूळ खात पडले आहेत. काही प्राण्यांचे हात-पाय तुटले आहेत, रंग गेला आहे. उद्यानामध्ये अनेक ठिकाणी बांधकामांचा राडारोडा पडला आहे.उद्यानांमध्ये राडारोडा...पुणेकरांचे आवडीचे व हक्काचे ठिकाण असलेल्या सारसबागेमध्ये देखील अनेक ठिकाणी जॉगिंग ट्रॅक व इतर कामे सुरू आहेत. यामुळे बांधकामांचा राडारोडा पडलाय, कोट्यवधी रुपये खर्च करून बसविण्यात आलेल्या ओपन जिमचे साहित्य तुटलेय, उद्यानात पालापाचोळ्याचे ढीग पडले आहेत.कमला नेहरू उद्यानामध्येदेखील मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते. परंतु येथेदेखील कारंजे बंद पडले आहे, फायटर विमानाची प्रतिकृती धुळीमुळे दुर्लक्षित झाली आहे. हडपसर, लोहियानगर भागातील काही उद्यानांची देखील हीच परिस्थिती असल्याचे निदर्शनास आले आहे.शहरातील उद्यानांमध्ये असलेल्या खेळण्यांची तर दुरवस्था झाली आहे, परंतु महापालिकेकडून सतत काढण्यात येणाऱ्या काँक्रीटच्या कामांमुळे अनेक उद्यानांमध्ये सर्वत्र राडारोडा, बांधकामासाठी लागणारी खडी, वाळू, पोती यांचे सर्वत्र ढीग पसरले आहेत. यामुळे उद्यानांमध्ये येणाºया ज्येष्ठ नागरिकांनादेखील याचा त्रास होत असल्याचे निदर्शनास आले.शहरामध्ये विविध ठिकाणी एकूण १९४ उद्याने असून, अनेक उद्याने अत्यंत जुनी व ऐतिहासिक आहेत. या उद्यानांच्या केवळ देखभाल व दुरुस्तीवर महापालिकेकडून दर वर्षी ४ ते ५ कोटी रुपयांचा खर्च केला जातो. तर उद्यानांमध्ये नवीन प्रकल्प व इतर कामे व व्यवस्थापन यावर दर वर्षी एकूण ३५ कोटी रुपयांचा खर्च केला जातो.नियमित केली जाते दुरुस्तीमहापालिकेकडून सर्व उद्यानांची नियमित देखभाल व दुरुस्ती केली जाते. शहरातील सर्वच उद्यानांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते. तर सुट्टीच्या दिवशी खेळण्यासाठी मुले गर्दी करतात. यामध्ये काही उद्यानांवर मोठ्या प्रमाणात ताण येतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅक, खेळण्याची दुरवस्था होते. परंतु महापालिकेच्या वतीने नियमितपणे सर्व उद्यानांची देखभाल व दुरुस्ती केली जाते. यामध्ये मुलांच्या खेळण्यावर अधिक लक्ष दिले जाते. यासाठी उद्यान विभागाच्या वतीने स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.- अशोक घोरपडे,उद्यान विभाग प्रमुख
आम्ही खेळायचे तरी कुठे?; उद्यानांमधील खेळण्यांची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 3:39 AM