पिंपरी : रिक्षाचे परमिट मिळविताना नागरिकांना मीटरप्रमाणे वाहतूक करण्याचा वाहतूक कायदा रिक्षाचालकांनी मीटरमध्ये बंद करून ठेवला आहे़ रिक्षाचालकांकडून सर्रास मीटर बंद ठेवून प्रवाशांची लुबाडणूक केली जात आहे़ प्रवाशांनी रिक्षाचालकांना मीटर सुरू करण्याचा आग्रह केला, तरीही त्यास मीटर सुरू होणार नाही़ शहरात कुठेही मीटर सुरू असलेली रिक्षा तुम्हाला मिळणार नाही़ जर मिळाली, तर पैज लावा, असा दावा करून प्रवाशांची कोंडी केली जात आहे़ शहरातील रिक्षाचालक बंद मीटर ठेवून प्रवाशांची आर्थिक पिळवणूक करीत आहे़ याबाबत लोकमतच्या प्रतिनिधींनी केलेल्या स्टिंंग आॅपरेशनच्या माध्यमातून ही रिक्षाचालकांची बनवेगिरी उघड झाली आहे़अगदी हाकेच्या अंतरावर जाण्यासाठीसुद्धा शंभर ते दीडशे रूपये रिक्षाभाडे वसूल केले जात आहे. प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लुबाडणूक होत असल्याचा प्रत्यय पदोपदी आला. सकाळी १० वाजण्याची वेळ आकुर्डीतील हुतात्मा चौकापासून ते डी.वाय. पाटील महाविद्यालयापर्यंत जाण्याकरिता किती भाडे ? असे विचारले असता, ५० रुपये द्या, असे रिक्षाचालकाने सांगितले. अंतर कमी आहे, भाडे जास्त आहे ,मीटरने भाडे किती होईल? असे विचारले असता, ठीक आहे, ४० रुपये द्या. असे म्हणत रिक्षावाला नेण्यास तयार झाला. त्यानंतर थोड्या वेळाने त्याच चौकात ११ च्या सुमारास तेथून डी मार्ट रावेत येथे जाण्यासाठी किती पैसे घेणार असे विचारले असता, रिक्षाचालकाने पटकन १०० रुपये असे उत्तर दिले. हे भाडे मीटरनुसार आहे का ? त्यावर मीटरनेही एवढेच पैसे होतात, असे रिक्षाचालकाने सांगितले.पिंपरी चिंचवडमध्ये कोणीही मीटर वापरत नाही.असेही सांगून रिक्षावाला मोकळा झाला.प्राधिकरणातील भेळ चौक ते लोकमान्य हॉस्पिटलपर्यंतच्या अवघ्या अर्ध्या किलोमीटरच्या अंतराला रिक्षावाल्याने २० रुपये भाडे सांगितले. कितीही जवळचे अंतर असेल तर किमान ३० रुपये भाडे आकारतो. तरिही तुम्हाला कमी भाडे सांगितले आहे. भेळ चौक ते कामायनी विशेष मुलांची शाळा, लोकमान्य हॉस्पिटल ते म्हाळसाकांत विद्यालय या मार्गावर रिक्षावाल्यांनी ३० रूपये भाडे सांगितले.एकानेही मीटरने पैसे घेण्याची तयारी दाखवली नाही.रिक्षा चालका मनमानी पद्धतीने भाडे आकारतात. परतीचे भाडे मिळत नाही, म्हणुन जादा प्रवासी भाडे घेतले जाते. असे रिक्षावाले सांगतात.रूग्णालयाजवळ असलेल्या रिक्षातळावर तर आवाच्च्या सव्वा रिक्षा भाडे सांगितले जाते. खेड्यातून नातेवाईकांना भेटण्यास पिंपरी चिंचवडमध्ये दाखल होणाऱ्यांना एसटीबसमधुन उतरताच रिक्षावाल्यांशी बोलल्यानंतर येथील महागाईचा अंदाज येतो. वायसीएमसारया रूग्णालयात गरिब, गरजू रूग्ण उपचार घेत असतात. त्यांना भेटण्यासाठी खेड्यातून येणाऱ्या नातेवाईकांकडून जवळचे अंतर जाण्यासाठीही शंभर ते दीडशे रुपये रिक्षावाले मागतात. ही एक प्रकारे अडवणुक आहे. अशा प्रतिक्रिया रूग्णालयाजवळील आणि एसटी आगाराजवळील रिक्षातळांवर कटू अनुभव आलेल्यांनी व्यकत केल्या. शासनाचे अनुदान,सवलती हव्यात,नियम पाळायला नकोतरिक्षा चालकांना सुरक्षा कायदा लागू करावा, सार्वजनिक वाहतूक सेवेत ते महत्वाची भूमिका बजावतात,त्यामुळे शासनाने त्यांना सवलती द्याव्यात. सीएनजी कीट बसविण्यासाठी अनुदान द्यावे. अशा मागण्या वेळोवळी रिक्षा संघटनांकडून होतात. रिक्षाचालकांना पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने सीएनजी कीट बसविण्यासाठी प्रत्येकी १२ हजार या प्रमाणे लाखो रुपये अनुदान दिले आहे. परमिटधारक केवळ पाच हजार आहेत. शहरात रिक्षा धावतात ३५ हजार असे सर्व काही विसंगत आहे. बॅच नसलेले अनेकजण रिक्षा चालवतात. परमिट एकाचे, रिक्षा दुसऱ्याची आणि शिफ्टवर चालविणारा तिसराच असे प्रकार रिक्षा व्यवसायात सुरू आहेत. प्रवाशांना सुरक्षितता नाही, रिक्षाने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची मात्र मोठ्या प्रमाणावर लुबाडणुक होत आहे.(प्रतिनिधी)संकलन : नवनाथ शिंदे, पुनम पाटीलठिकाण : पिंपरी, गांधीनगरचे रिक्षातळ वेळ : २ वाजून २० मिनिटेप्रतिनिधी : फिनोलेक्स चौकात जायचे आहे़रिक्षाचालक : ४० रुपये होतील़प्रतिनिधी : अहो, एक किलोमीटर अंतर नाही आणि एवढे पैसे कसे ? मीटर सुरू करून चला.रिक्षाचालक : (हसून ) शहरात नवीन आहे काय? इकडे कोणीच रिक्षावाला मीटर वापरत नाही.हे माहित नाही. शेअर ए रिक्षा परवडतेम्हाळसाकांत विद्यालय ते निगडी, म्हाळसाकांत विद्यालय ते आकुर्डी या अवघ्या अर्धा किलोमीटरच्या अंतरासाठी २० रुपये तर शेअर - ए- रिक्षा पद्धतीने निगडी ते कासारवाडी या आठ किलो मीटरअंतरासाठी २० रूपये अशी भाड्यातील विसंगती दिसून येते. मीटरपेक्षा ही शेअर-ए-रिक्षा प्रवाशांना तसेच रिक्षाचालकानां फायद्याची ठरते. पण, अंतर्गत भागात शेअर ए रिक्षाचे मार्ग नाहीत. ठिकाण : डॉ़ आंबेडकर चौक, वेळ : २ वाजून ३० मिनिटेप्रतिनिधी : खंडोबा माळ चौकात जायचे आहे़रिक्षाचालक : बसा़ दीडशे रुपये होतील़प्रतिनिधी : एवढे? मीटरप्रमाणे चला़ जेवढे होतील तेवढे देतो़रिक्षाचालक : आम्ही मीटरने रिक्षा चालवत नाही़ परवडत असेल तर चला .प्रतिनिधी: अहो तीन -चार किलोेमीटरसाठी एवढे पैसे घेणे लुबाडणूक आहे.रिक्षाचालक : ते नियमाचं तुम्ही बघा़ आम्हाला आमचा धंदा माहीत आहे़प्रतिनिधी : पण मीटर सुरू करून चला़ काय अडचण आहे का ?रिक्षाचालक: बरं, चला़ तुमच्या समाधानासाठी आज पहिल्यांदा मीटर टाकतोय.
कोठे मिळणार मीटर रिक्षा?
By admin | Published: August 14, 2016 5:18 AM