मोरगाव (पुणे): बारामती तालुक्यातील का-हाटी येथील कऱ्हा नदी पुलावरून काल (दि. ११) रोजी रात्री एक चारचाकी गाडी नदीपात्रात वाहून गेली. लोणी भापकर येथील डॉक्टर बारवकर यांची ही गाडी असून कऱ्हा नदीवरील पुल पार करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने ही गाडी वाहून गेली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, काल दिवसभर मोठ्या प्रमाणात मुसळधार व ढगफुटीसदृश्य पाऊस बारामती तालुक्यासह सर्वदूर होता. यामुळे नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. काऱ्हाटी येथे वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर बारवकर हे त्यांचा दवाखाना बंद करून लोणी भापकर येथे जात होते. बारवकर कऱ्हा नदी पात्रातील पुलावरून जात असताना पाण्याचा त्यांना अंदाज आला नाही. नदी पात्रातील मध्यभागी असणाऱ्या पुलावर गेले पाणी आणखी वाढले. यामुळे पुलावरून गाडी वाहू लागली.
या दरम्यान बारवकर यांनी गाडीतून उडी मारली व ते सुदैवाने बचावले. चारचाकी गादी नदीपात्रामध्ये अडकली आहे. नदी पात्रातील पुलावरून पाणी वाहत असताना पात्रात न जाण्याचे आवाहन महसूल खात्याच्यावतीने करण्यात आले आहे.