पुण्याला पैसे देताना भाजपचा दुजाभाव मात्र, मी निधी कमी पडू देणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 09:35 PM2020-01-27T21:35:53+5:302020-01-27T21:38:51+5:30
पुणे जिल्ह्याला सन २०१९-२० च्या जिल्हा नियोजन वार्षिक आराखड्यात मंजूर रक्कमेपैकी तब्बल ९८ कोटी रुपयांचा निधी कमी दिल्याचे पवार म्हणाले.
Next
पुणे : भाजप सरकारने विकास कामांसाठी निधी वाटप करताना दुजाभाव केल्याचा आरोप राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (ता. २७) पुण्यात केला. पुणे जिल्ह्याला सन २०१९-२० च्या जिल्हा नियोजन वार्षिक आराखड्यात मंजूर रक्कमेपैकी तब्बल ९८ कोटी रुपयांचा निधी कमी दिल्याचे पवार म्हणाले. जिल्हा नियोजन वार्षिक आराखड्यात निधी वाटप करताना एक सुत्र निश्चित झाले आहे. त्यामुळे कोणतेही सरकार आले किंवा गेले तरी या सूत्रानुसारच वाटप झाले पाहिजे, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पुणे विभागातील पाच जिल्ह्यांचा सन २०२०-२१ या वर्षासाठीचा जिल्हा वार्षिक नियोजन आराखड्याची आढावा बैठक पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात झाली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर, संबंधितजिल्ह्यातील आमदार, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी आदी प्रमुख उपस्थित होते. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत पवार म्हणाले, गेल्यावर्षी पुणे जिल्ह्यासाठी ६१९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यापैकी ५२१ कोटी रुपये मिळाले. त्यावेळी मंत्री,आमदार कोण होते याचा उल्लेख करून पवार म्हणाले आज बैठकीला खासदार गिरीश बापट उपस्थित नाहीत, नाही तर ही गोष्ट मी त्यांच्या निदर्शनास आणली असती.
आता माझ्याकडे राज्याचा अर्थमंत्री आणि पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री अशी दुहेरी जबाबदारी आहे. यामुळे पुणे जिल्ह्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. नियमानुसार निधी मंजूर करताना पाच-दहा कोटींचा फरक समजू शकतो, पण, पुण्यासारख्या जिल्ह्याला ९८ कोटी रुपये कमी मिळाले हे योग्य नाही.