पुणे अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी कोण ?अजितदादांचा माणूस की वळसेपाटलांच्या तालुक्यातील अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 08:57 PM2020-08-27T20:57:15+5:302020-08-27T21:01:24+5:30
सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात जोरदार चर्चा सुरू
पुणे : पुण्याच्या गेल्या दोन महिन्यांपासून रिक्त असलेले अतिरिक्त जिल्हाधिकारी पदासाठी अनेक अधिका-यांनी जोरदार फिल्डींग लावली आहे. या पदावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मर्जीतील विजयसिंह देशमुख यांची की कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव तालुक्यातील अजिंक्य पडवळ यांची नियुक्ती होणार याची जोरदार चर्चा सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारी पद मागील तीन महिन्यांपासून रिक्त आहे. जिल्हाधिकारी पदावर डाॅ. राजेश देशमुख यांची निवड झाल्यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी पदी कोणाची नियुक्ती होणार यांची चर्चा सुरू आहे. हे पद रिक्त असल्याने प्रलंबित केसेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या पदासाठी अनेक अधिकाऱ्यांनी फिल्डिंग लावली आहे. या आघाडीवर सध्या सिडको ठाणे विभागाचे अतिरिक्त मुख्य भूमी व भूमापण अधिकारी अजिंक्य पडवळ, प्रमोशन झालेले विजयसिंह देशमुख, सध्या पुणे महापालिकेत असलेले व माजी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे आणि पुण्यात एसआरेमध्ये पोस्टींग असलेले माजी निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश जाधव यांची नावे चर्चेत आहेत. परंतु सध्या केवळ दादाचा माणूस की आंबेगावचे अधिकारी या पदावर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या दोन-तीन दिवसांत ऑर्डर निघण्याची शक्यता आहे.