लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लाच प्रकरणात अटकेत असलेले स्थायी समिती सभापती नितीन लांडगे व त्यांच्या स्वीय सहाय्यकासह इतर आरोपी ‘ते १६ जण कोण?’ याची माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. तसेच मालमत्तेबाबत उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. त्यामुळे या गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी पाच जणांच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
नितीन लांडगे, स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे, विजय चावरिया, राजेंद्र शिंदे आणि अरविंद कांबळे यांच्या कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आहे. ‘वर्क ऑर्डर’च्या करारनाम्यावर स्वाक्षरी करण्यासाठी १ लाख १८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षांसह पाच जणांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने बुधवारी (दि. १८) महापालिका मुख्यालयात रंगेहाथ पकडले.
त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत शनिवारी (दि. २१) संपल्याने पाचही जणांना न्यायालयात पुन्हा हजर केले असता, आरोपी पोलीस तपासात सहकार्य करत नाही. कार्यालयात सापडलेल्या ५ लाख ६८ हजार रुपयांच्या रोख रकमेबाबत समाधानकारक उत्तरे देत नाहीत. ३ टक्क्यांची रक्कम कमी करून २ टक्के करण्याची विनंती केली असता, आरोपी ज्ञानेश्वर पिंगळे यांनी ‘ते वर १६ जणांना द्यावे लागतात’, असे सांगितल्याचे ‘रेकॉर्ड’ झाले आहे. याबाबत आरोपींकडे तपास करता त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला आहे. त्याबाबत आरोपींकडे अधिक तपास करणे आहे. आरोपींच्या मालमत्तांबाबत एसीबीला माहिती घ्यायची आहे. टक्केवारीचे हे एक प्रकारचे मोठे ‘रॅकेट’ असून यात आणखी कोण-कोण सामील आहे. याचा तपास करायचा आहे. निविदा प्रक्रिया आणि बीडसंबंधी कागदपत्रे हस्तगत करण्याची कारवाई सुरू आहे. गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकील रमेश घोरपडे यांनी केली.