भारत माता सधवा का विधवा हे ठरवणारे तुम्ही कोण? रुपाली चाकणकरांचा भिडेंना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 06:11 PM2022-11-28T18:11:11+5:302022-11-28T18:11:38+5:30
मुलीने टिकली लावली नाही म्हणून तिला नाकारणाऱ्या मनुवादी भूमिकेला मात्र माझा विरोध
पुणे : संभाजी भिडे यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत होते. त्यावेळी एका महिला पत्रकार त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी आल्या असता भिडेंनी महिलेला कुंकू लावण्याचा सल्ला दिला. तसेच प्रत्येक स्त्री ही भारतमातेचं रुप आहे, अन् आमची भारतमाता विधवा नाही. तू आधी कुंकू लाव मग तुझ्याशी बोलतो, असे संभाजी भिडे त्यावेळी म्हणाले होते. त्यावरून संपूर्ण राज्यातून भिडेंवर टीका होऊ लागली आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर आज आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सुद्धा भिडे यांचा समाचार घेतला आहे. भारत माता सधवा का विधवा हे ठरवणारे तुम्ही कोण ?, असा सवाल चाकणकर यांनी भिडेंना विचारला आहे.
पुण्यात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने सोमवारी महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते यशवंत मनोहर यांना महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
चाकणकर म्हणाल्या, संभाजी भिडे मुलींना टिकली लावण्याचा आग्रह धरतात. त्यांना मला सांगायचंय की, ज्या सावित्रीमाई आडवं कुंकू लावत होत्या डोक्यावरून पदर घेत होत्या. त्यांनाही तुम्ही त्रास दिला. या सनातनी मानसिकतेला आमचा विरोध आहे आणि इथून पुढेही राहील. जिजाऊ, लक्ष्मीबाई, अहिल्याबाई यांचं योगदान काहीच नाही का? भारत माता सधवा का विधवा हे ठरवणारे तुम्ही कोण? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
विधवांचा सन्मान करण्यासाठी आम्ही हळदीकुंकू सोहळा करतो. मुलीने टिकली लावली नाही म्हणून तिला नाकारणाऱ्या मनुवादी भूमिकेला मात्र माझा विरोध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.