नवे पुणे पोलीस आयुक्त कोण? शहरातील ७ उपायुक्तांच्याही बदल्या होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 03:19 AM2018-04-01T03:19:38+5:302018-04-01T03:19:38+5:30
राज्य विधिमंडळ अधिवेशन संपल्याने आता विविध खात्यातील बदल्यांची चर्चा सुरू झाली आहे़ पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांचा पुण्यातील कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांची बदली निश्चित मानली जात असून, त्यांच्या जागी नवे पोलीस आयुक्त कोण असतील, याविषयी शहरात चर्चा सुरू झाली आहे.
पुणे : राज्य विधिमंडळ अधिवेशन संपल्याने आता विविध खात्यातील बदल्यांची चर्चा सुरू झाली आहे़ पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांचा पुण्यातील कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांची बदली निश्चित मानली जात असून, त्यांच्या जागी नवे पोलीस आयुक्त कोण असतील, याविषयी शहरात चर्चा सुरू झाली आहे़
पुणे शहर पोलीस आयुक्त पदासाठी नागपूरचे पोलीस आयुक्त वेंकटेशन, कारागृह महानिरीक्षक व अतिरिक्त पोलीस महासंचालक भूषणकुमार उपाध्याय यांच्यासह आणखी दोन ते तीन नावांची सध्या पोलीस दलात चर्चा सुरू आहे़ रश्मी शुक्ला यांची मुंबई येथे बदली होण्याची शक्यता वर्तविली जात आहे़
सीआयडीचे प्रमुख संजय कुमार, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, एटीएसचे अतुलकुमार कुलकर्णी, महामार्ग सुरक्षा पोलीस दलाचे आऱ के़ पद्मनाभन या अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे़ त्यामुळे बदल्यांच्या पहिल्या टप्प्यात त्यांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे़
रश्मी शुक्ला यांनी आपल्या कार्यकाळात अनेक चांगली कामे मार्गी लावली़ बेकायदा कामे करणाºया अधिकारी व कर्मचाºयांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला़ बडीकॉप, पोलीसकाका यासारखे उपक्रम सुरू केले़ ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र कक्ष, २४ तास हेल्पलाइन सुविधा हे उपक्रम अधिक कार्यक्षमतेने कसे चालतील, याकडे लक्ष दिले़ मे २०१९ मध्ये लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे आता होणाºया सर्वसाधारण बदल्यांमध्ये आपल्याला सोयीचे असतील, असे अधिकारी महत्त्वाच्या जागांवर नियुक्त करण्याचा राज्य शासनाचा विचार असणार आहे़ त्यादृष्टीने पुढील महिन्यात होणाºया बदल्यांना महत्त्व असणार आहे़
कॅटने पोलीस अधिकाºयांच्या बढत्यांबाबत नुकताच एक निर्णय दिला़ त्याची अंमलबजावणी राज्य शासनाकडून केली जाण्याची शक्यता आहे़ त्यामुळे विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त संजय बाविस्कर आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या गु्रप एकचे कमांडंट सुनील फुलारी यांची पोलीस महानिरीक्षकपदावर बढतीवर बदली होण्याची शक्यता आहे़ काही पोलीस उपायुक्तांचा कार्यकाल पूर्ण झाला नसला, तरी त्यांच्याकडे जिल्ह्याची स्वतंत्र जबाबदारी सोपवून त्यांची बदली केली जाण्याची शक्यता आहे़ सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक यांच्या बदल्याही वरिष्ठ अधिकाºयांच्या बदल्यांच्या पाठोपाठ बदल्या होण्याची शक्यता आहे़ पुणे शहरातील ४२ सहायक पोलीस निरीक्षकांचा शहरातील ६ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे़
बदल्यांना राजकीय रंग
निवडणुकांच्या काळात महत्त्वाच्या कार्यकारी पदांवरील पोलीस अधिकाºयांची भूमिका अनेकदा अतिशय महत्त्वाची ठरते़ त्यामुळे आपल्याला सोयीचे व्हावे, असे पोलीस अधिकारी आपल्या मतदारसंघात असावेत, अशी बहुतेक खासदार, आमदारांची अपेक्षा असते़ त्यामुळे एप्रिल, मे महिन्यात होणाºया या सर्व बदल्यांना एक राजकीय रंंग असण्याच्या शक्यता आहे़ त्यामुळे पुढील वर्षी होणाºया लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या दृष्टीनेही या बदल्यांना विशेष महत्त्व दिले जात आहे़
अतिरिक्त पोलीस आयुक्तांचे पदही भरणार?
अतिरिक्त पोलीस आयुक्त (दक्षिण विभाग) हे पद गेले अनेक महिने रिक्त असल्याने या बदल्यांमध्ये या पदावरही नियुक्ती होऊ शकते़ याशिवाय पुणे शहरातील ७ पोलीस उपायुक्तांचा दोन वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाला आहे अथवा येत्या काही महिन्यांत पूर्ण होत आहे़ त्यामुळे राज्यातील पोलीस आयुक्तांबरोबर त्यांच्याही बदल्या होऊ शकतात़ त्यात पोलीस उपायुक्त शेषराव सूर्यवंशी, बसवराज तेली, सुधीर हिरेमठ, पकंज डहाणे, दीपक साकोरे, गणेश शिंदे, डॉ़ प्रवीण मुंडे यांचा समावेश आहे़