संपूर्ण लक्ष्मी रस्ता येणार आता सीसीटिव्हीच्या नजरेत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 08:08 PM2019-07-19T20:08:15+5:302019-07-19T20:09:17+5:30
लक्ष्मी रस्त्यावरील व्यापाऱ्यांनी सुरक्षेच्या दृष्टीकाेनातून आपल्या दुकानासमाेर सीसीटिव्ही लावण्याचे आवाहन पाेलिसांकडून करण्यात आले. त्याला व्यापाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
पुणे : शहरातील माेठी बाजारपेठ आणि महत्त्वाचा असणारा लक्ष्मी रस्ता आता संपूर्णरित्या सीसीटिव्हीच्या नजरेत येणार आहे. आज अपर पाेलीस आयुक्त अशाेक माेराळे यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मी राेडवरील कापड व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यात ऑगस्ट अखेरपर्यंत लक्ष्मी रस्त्यावरील सर्व कापड व्यापारी त्यांच्या दुकानासमाेर सीसीटिव्ही कॅमेरे बसवतील असे आश्वासन व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींकडून देण्यात आले.
पुण्यातील लक्ष्मी रस्ता हा शहरातील अति महत्त्वाच्या रस्त्यांपैकी एक आहे. या रस्त्यावर साेने, कापड व इतर अनेक वस्तूंची दुकाने आहेत. या रस्त्याला माेठी ऐतिहासिक पार्श्वभूमी देखील आहे. याच रस्त्यावरुन पुण्यातील मानाचे गणपतींची तसेच महत्त्वाच्या गणपती मंडळांची मिरवणुक गणेशाेत्सवात निघत असते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकाेनातून हा रस्ता संवेदनशील आहे. राेज या रस्त्यावर नागरिकांची गर्दी असते. त्यामुळे या संपूर्ण रस्त्याच्या सुरक्षेसाठी पुणे पाेलिसांकडून सी वाॅच प्रकल्प राबविण्यात येत आहे. दुकानात तसेच दुकानांसमाेर सीसीटिव्ही कॅमेरे असतील तर संशयित व्यक्तींचा तसेच चाेरांचा शाेध लावणे साेपे जाते. लक्ष्मी रस्त्यावरील सीसीटिव्हीच्या माध्यमातून जे गुन्हे उघडकीस आले त्याबाबत बैठकीत व्यापाऱ्यांना माहिती देण्यात आली. तसेच फरासखाना पाेलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या तपकीर गल्लीतील एका साेनार व्यापाऱ्याचे हरविलेले साेने सुद्धा सीसीटिव्हीच्या माध्यमातून शाेधण्यात यश आल्याचे व्यापाऱ्यांना सांगण्यात आले.
या बैठकीत जास्तीत जास्त व्यापाऱ्यांनी सी वाॅच या प्रकल्पात सहभाग घेऊन आपल्या दुकानात व बाहेर सीसीटिव्ही लावण्याचे आवाहन पाेलिसांकडून करण्यात आले. त्याला व्यापाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ऑगस्ट अखेर लक्ष्मी रस्त्यावरील सर्व कापड व्यापाऱ्यांच्या दुकानाच्या समाेर कॅमेरे बसविण्यात येतील असे आश्वासन व्यापाऱ्यांकडून देण्यात आले. या बैठकीला व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राहुल बाेरा, राज भंडारी, अजित पटेल, राजेश शेरवानी, जयेश कासट आदी उपस्थित हाेते. तसेच फरासखाना पाेलीस स्टेशनचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक किशाेर नावंदे, विश्रामबाग पाेलीस स्टेशनचे वरीष्ठ पाेलीस निरीक्षक कलगुटकर हजर हाेते.
या बैठकीबाबत बाेलताना अपर पाेलीस आयुक्त अशाेक माेराळे म्हणाले, आजच्या बैठकीत सी वाॅच प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद दिला. ऑगस्ट अखेरपर्यंत सीसीटिव्ही लावण्याचे आश्वासन कापड व्यापाऱ्यांकडून देण्यात आले. आत्तापर्यंत लक्ष्मी रस्त्यावर 27 हजार सीसीटिव्ही लावण्यात आले आहेत. कापड व्यापाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे यापुढे संपूर्ण लक्ष्मी रस्ता सीसीटिव्हीच्या कक्षेत येणार आहे.