राजकीय नेत्यांऐवजी रंगकर्मींच्या नावाने नाट्यगृह का नाही? ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शाह यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 09:35 AM2024-01-19T09:35:02+5:302024-01-19T09:39:58+5:30

महाराष्ट्र हे नाटकांचे माहेरघर समजले जाते. मात्र याठिकाणी रंगकर्मींच्या नावाने नाट्यगृहे अगदी तुरळक असल्याचेही ते म्हणाले...

Why not a theater in the name of artists instead of political leaders? Senior actor Nasruddin Shah's question | राजकीय नेत्यांऐवजी रंगकर्मींच्या नावाने नाट्यगृह का नाही? ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शाह यांचा सवाल

राजकीय नेत्यांऐवजी रंगकर्मींच्या नावाने नाट्यगृह का नाही? ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शाह यांचा सवाल

पुणे : आपल्या देशात अनेक राजकीय, सामाजिक काम करणाऱ्या नेत्यांची नावे नाट्यगृहांना दिली जातात. मात्र ज्यांनी खऱ्या अर्थाने नाटकं जगवली आणि ज्यांनी नाटकं सामान्यांपर्यंत पोहोचवली, अशा महान रंगकर्मींच्या नावाने नाट्यगृह का नाही?, असा सवाल ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शाह यांनी केला. महाराष्ट्र हे नाटकांचे माहेरघर समजले जाते. मात्र याठिकाणी रंगकर्मींच्या नावाने नाट्यगृहे अगदी तुरळक असल्याचेही ते म्हणाले.

महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि लागू परिवार यांच्या वतीने टिळक रस्त्यावरील हिराबाग चौक येथील ज्योत्स्ना भोळे सभागृहाच्या इमारतीत पहिला मजला येथे "श्रीराम लागू रंग-अवकाश थिएटर"चे उद्घाटन गुरुवारी (दि. १८) झाले. या प्रसंगी ते बोलत होते. दीपा लागू, मुलगा डॉ. आनंद लागू, महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे अध्यक्ष डॉ. मोहन आगाशे, कार्याध्यक्ष एस. पी. कुलकर्णी, प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक शाह आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

नसरुद्दीन शाह म्हणाले, ‘‘ज्येष्ठ रंगकर्मी गिरीश कर्नाड, शंभू मित्रा, तन्वीर हबीब, पं. सत्यदेव दुबे या कुणाच्याही नावाने थिएटर नाही, ही वस्तुस्थिती एक रंगकर्मी म्हणून मला खटकते. रंगभूमीच्या जन्मस्थानी महाराष्ट्रात फक्त बालगंधर्व आणि डॉ. घाणेकर यांचे अपवाद वगळता रंगकर्मींच्या स्मृतींचे थिएटर नाही. पुण्यात आज डॉ. लागू यांच्या नावाने हा नवा रंग अवकाश सुरू झाला आणि त्याचे उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली, याने मी सन्मानित झालो आहे. हा नवा रंग-अवकाश म्हणजे रंगकर्मींचे दुसरे घर होवो, हीच अपेक्षा.’’

यावेळी नसरुद्दीन शाह यांनी डॉ. श्रीराम लागू यांच्या आठवणींनाही उजाळा दिला. आधेअधुरे’ या नाटकातील त्यांचे काम पाहून माझा श्वास थांबला की काय, असे वाटत होते. आवाजाचा लवचिक वापर, डोळ्यातले भाव, सहजता, भावनांवरील कमालीचे नियंत्रण हे सर्वच माझ्यासाठी विलक्षण होते. मी त्यांची ‘गिधाडे’, ‘कस्तुरीमृग’, ‘सूर्य पाहिलेला माणूस’ ही नाटके; तसेच ‘सामना’ हा चित्रपट पाहिला. मी असे काम कधी करू शकेन का? असा प्रश्न स्वतःला विचारला आणि 'नाही' असे उत्तर मिळाले. पण नकळत एकलव्याप्रमाणे मी त्यांच्याकडून खूप शिकत राहिलो, अशी भावनाही शाह यांनी व्यक्त केली.

रंग-अवकाश नाट्यगृहाची वैशिष्ट्ये :

प्रायोगिक रंगभूमीचे अवकाश अधिक प्रगल्भ आणि त्यात अनोखे सादरीकरणाचे प्रयोग करता यावेत, यासाठी खास पुणेकर रसिकांसाठी आणि नाटक करणाऱ्यांसाठी हे थिएटर उभारण्यात आले आहे. तसेच हे थिएटर 'ब्लॅक बॉक्स'चा उत्तम नमुना आहे. यामध्ये विविध पद्धतीने सादरीकरण कलाकारांना करता येणार आहे. शेवटी बसलेल्या रसिकाला व्यवस्थित नाटक कलेचा अनुभव घेता येईल, अशी आसनव्यवस्था करण्यात आली आहे.

Web Title: Why not a theater in the name of artists instead of political leaders? Senior actor Nasruddin Shah's question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.