तरुणपण कारागृहात घालवणार का मर्दा? शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांमध्ये सर्वाधिक ७८ टक्के तरुण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 09:56 AM2022-08-24T09:56:17+5:302022-08-24T09:57:03+5:30
कारागृह क्षमतेपेक्षा २८७ टक्के..
पुणे : अजाणतेपणी गुन्हेगारी कृत्य घडलेली अल्पवयीन मुले गुन्हेगारी क्षेत्राकडे वळण्याची दाट शक्यता असते. त्यातून त्यांचे तरुणपण कारागृहातच जाते. येरवडा कारागृहात सध्या शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांपैकी ७८ टक्के कैदी हे २१ ते ४० या वयोगटातील आहेत. त्यातील बहुसंख्य कैदी हे अल्पवयीन असल्याच्या काळापासून गुन्हेगारी कृत्यात ओढले गेल्याचे दिसून येते. अशा विधि संघर्षित बालकांसाठी पुणे शहर पोलिसांनी विशेष बाल पोलीस पथकाची स्थापना केली असून, त्यांच्यामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे सकारात्मक बदल होत असून, विधि संघर्षित बालकांना आयुष्य जगण्याची नवी वाट मिळण्यास मदत होत आहे.
कारागृह क्षमतेपेक्षा २८७ टक्के
येरवडा हे राज्यातील सर्वात जुने कारागृह या कारागृहातील बंदीची क्षमता २४४९ इतकी आहे. असे असताना ३१ जुलै २०२२ अखेर एकूण सात हजार ३३ बंदी यांना ठेवण्यात आले आहे. हे प्रमाण क्षमतेच्या तब्बल २८७ टक्के इतके आहे. त्यात शिक्षा झालेल्या पुरुषांची संख्या एक हजार १११ असून, ९८ स्त्रिया आहेत, तर पाच हजार ५५० पुरुष न्यायाधीन कैदी असून, २०० महिला आहेत. तसेच ६८ स्थानबद्ध केलेल्या गुंडांचा समावेश आहे. पुरुषांच्या खुल्या कारागृहाची क्षमता १७२ असताना त्यात २०० कैदी ठेवण्यात आले आहे.
७० टक्के तरुण कैदी
कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या जवळपास एक हजाराहून अधिक तरुणांचे प्रमाण अधिक आहे. २१ ते ४० वयोगटातील जवळपास ७८ टक्के कैद्यांचा समावेश आहे.
शिक्षा झालेल्या कैद्यांचे प्रमाण
१८ ते २१ वयोगट - २ टक्के
२१ ते ३० वयोगट - ३५ टक्के
३१ ते ४० वयोगट - ४३ टक्के
४१ ते ५० वयोगट - १५ टक्के
५० ते ६० वयोगट - ३ टक्के
६० वर्षांपुढील - २ टक्के
न्यायालयीन बंदींची संख्या मोठी
कारागृहामध्ये न्यायालयीन बंद्यांची संख्या ही सर्वात मोठी समस्या बनली आहे. त्यातील अनेकांना केवळ वकील मिळत नसल्याने त्यांच्या जामिनासाठी प्रयत्न होत नाही. त्यामुळे ते वर्षानुवर्षे कारागृहात खितपत पडलेले असल्याचे दिसून येते.