पुणे : पुणे शहरातील कोथरूड भागातील महात्मा सोसायटीच्या परिसरात ९ डिसेंबर २०२० साली रानगवा आला होता. काेथरूडमध्ये सुमारे सात तासांपेक्षा जास्त वेळ या गव्याचा थरार सुरु होता. त्याने माणसांच्या जंगलातून पळण्याचा प्रयत्न केला. पण त्याला वाट सापडली नाही. गव्यासाठी दुर्दैवी ठरलेल्या सात तासांमध्ये नागरिक त्याचे फाेटाे काढत राहिले. माेबाइलमध्ये चित्रिकरण करत राहिले. नागरिकांच्या गाेंगाटामुळे घाबरलेला गवा सैरावैरा धावत राहिला. अखेर वनविभागाने त्याला गुंगीचे औषध देऊन आणि जाळीच्या साहाय्याने ताब्यात घेतले. गव्याला शरीरावर झटापटीत अनेक ठिकाणी जखमा झाल्या होत्या. पण उपचारादरम्यान या रानगव्याचा मृत्यू झाला.
या घटनेला एक वर्ष उलटल्यानंतर आता त्याचे प्रायाश्चित करण्यासाठी कोथरुडमधील निसर्ग व प्राणी प्रेमी मित्र परिवार आणि चेंज इंडिया फाऊंडेशनकडून प्रायश्चित सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेचे फ्लेक्स कोथरुडमध्ये लावण्यात आले आहेत. कोथरुडमधील डावी भुसारी कॉलनी येथे ही सभा ९ डिसेंबरला संध्याकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सभेचे फेसबुक लाईव्ह देखील करण्यात येणार आहे.
गव्याला मृत्यूने गाठले होते
या गव्याचे ७०० ते ८०० किलो वजन असून उंची पाच ते साडेपाच फूट होती. त्याचे वय अंदाजे ३ ते ४ वर्षांचे असावे, असे वनखात्याने सांगितले होते. गुंगीच्या औषधांचा अतिमारा, घाबरुन हृदय बंद पडणे, धावपाळ-भूक यामुळे झालेले श्रम यातल्या कोणत्या कारणामुळे गव्याचा मृत्यू झाला याबद्दल पुणेकर आणि प्राणिमित्रांमध्ये चर्चाही झाली होती. महात्मा सोसायटीतील नागरिकांना घरात थांबायला सांगून बचाव पथकाने जाळी लावून, गुंगीचे औषध देऊन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, हुलकावणी देत गवा पसार झाला. त्यानंतरही अथक प्रयत्न करुन गव्याच्या गळ्याला गुंगीचे औषध देऊन पकडले. उपचारादरम्यान अखेर गव्याला मृत्यूने गाठले होते.
सात तासांचा झाला होता थरार
महात्मा सोसायटीपासून साधारण तीन-चार किलोमीटर पळताना आसपासच्या एकाही नागरिकावर गव्याने हल्ला केला नाही. गव्याची धडक खूप जबरदस्त असते. गव्याच्या धडकेत कायमचे जायबंदी करण्याची किंवा वर्मी धडक बसल्यास प्राण घेण्याची ताकद असते. काेथरूडमधल्या सुमारे सात तासांमध्ये गव्याने माणसांच्या जंगलातून पळण्याचा प्रयत्न केला. पण त्याला वाट सापडली नाही. गव्यासाठी दुर्दैवी ठरलेल्या सात तासांमध्ये नागरिक त्याचे फाेटाे काढत राहिले. माेबाइलमध्ये चित्रिकरण करत राहिले. नागरिकांच्या गाेंगाटामुळे घाबरलेला गवा सैरावैरा धावत राहिला. नागरिकसुद्धा त्याचा पाठलाग करत राहिले आणि नंतर दिवसभर साेशल मीडियातही गवा व्हायरल करत राहिले.
''निसर्ग व प्राणी प्रेमी मित्र परिवार आणि चेंज इंडिया फाऊंडेशनचे अध्यक्ष सचिन धनकुडे म्हणाले, हा गवा देखील माझ्या कुटुंबातील एक घटक होता. त्याला आम्ही जनता, प्रशासनाने पळवून पळवून मारला. दरवर्षी पुण्यस्मरण दिन आयोजित करुन जनजागृती करणार आहोत. तसेच प्रशासनाने देखील असा एखादा प्राणी मानवी वस्तीत आला तर लोकांनी कशा प्रकारे वागले पाहिजे याबाबत नियम करायला हवेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.''