बारामतीत अपक्ष निवडणुक लढविणारच, माघार नाही; विजय शिवतारे लोकसभा लढवण्यावर ठाम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 07:34 PM2024-03-25T19:34:46+5:302024-03-25T19:35:41+5:30
खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या लढाईत आता विजय शिवतारे आले असून बारामतीत तिरंगी लढत होणार
पुणे : बारामतीलोकसभा मतदार संघामधुन अपक्ष निवडणुक लढविणार आहे. येत्या १२ एप्रिलला १२ वाजता आपण लोकसभेचा अपक्ष अर्ज भरणार असल्याचे शिवसेनेचे नेते आणि माजी राज्य मंत्री विजय शिवतारे यांनी जाहीर केले. खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या लढाईत आता विजय शिवतारे आले आहेत. त्यामुळे बारामतीमध्ये तिरंगी लढत होणार आहे.
पुरंदर मधील प्रमुख कार्यकत्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर विजय शिवतारे पत्रकाराशी बोलत होते. यावेळी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली. शिवतारे म्हणाले, सहा विधानसभा मतदार संघातील सर्वांना बोलावले होते. सर्व प्रमुख नेत्यांची बैठक आज पार पडली. लोकसभेसाठी आता लोक सांगत आहेत की माघार घेऊ नका. लोक मला कानात सांगतात ही त्यांची भीती आहे. यामुळे आता पर्याय हवा आहे. मतदार संघातून पवार रुपी हुकुमशाही संपवण्यासाठी आता माझे धर्मयुद्ध आहे. मोठे मोठे राजकीय पुढारी सांगत होते की मी काय करणार आहे. पण मी आमदार झालो तेव्हा 25 हजार मतांनी मी जिंकलो. सगळ्या लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला. आताही मी निवडणूक लढणारच, आता माघार नाही असे ही शिवतारे यांनी सांगितले.
उमेदवार बदलला जाईल
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडून बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार बदलला जाईल अशी चर्चा सुरू आहे. वरिष्ठ नेत्यांनी याचा विचार करावा, अनेक जण इच्छुक आहेत. हर्षवर्धन पाटलांचं मला माहित नाही, पण मी माघार घेणार नाही असेही विजय शिवतारे यांनी सांगितले.
विजय शिवतारें यांची १ एप्रिलला जाहीर सभा
शिवतारेंची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी अजित पवार गटातील लोकांकडून होत आहे. पालखीतळ मैदान सासवड या ठिकाणी १ १ एप्रिलला जाहीर सभा होणार आहे. . मी विरोधक आहे, ते मागणी तर करणारंच, असं विजय शिवतारें यांनी सांगितले.