सतीश सांगळे इंदापूर (कळस) : राज्यात विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या नऊ जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.यामध्ये भाजपकडून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांचे पारंपरिक विरोधक असल्याने बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढविण्यासाठी पाटील यांना बळ दिले जाण्याची शक्यता आहे.विधानपरिषदेच्या नऊ जागांपैकी भाजप पक्षीय बलानुसार ४ जागा लढविणार असल्याचे निश्चित आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात एक जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे .भाजपने पश्चिम महाराष्ट्रात मोठे यश मिळवल्याने २०१४ ला सत्ता स्थापन करण्यात आली होती .मात्र , २०१९ ला पश्चिम महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे संख्याबळानुसार सत्तेपासून अलिप्त राहावे लागले.पश्चिम महाराष्ट्रातील सातारा येथील उदयनराजे भोसले यांची नुकतीच राज्यसभेवर निवड करण्यात आली आली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातुन बारामती लोकसभा मतदारसंघातील ताकद वाढविण्यासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची विधानपरिषदेत वर्णी लागण्याची शक्यता आहे .पाटील यांना मंत्री म्हणून १९ वर्षे कामकाज पाहिले आहे.तसेच बारामती लोकसभा मतदारसंघात पाटील यांचा इंदापुर तालुका असुनही राष्ट्रवादी काँग्रेस व पवार कुटुंबियांना कडवा विरोध राहिला आहे. पाटील यांचे चुलते स्व. शंकरराव पाटील यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पासुन अलिप्त राहणेच पसंत केले होते. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ स्तरावरुन पाटील यांना ताकद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाटील यांचे समर्थक बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनीही जाहीर कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांच्याकडे हर्षवर्धन पाटील यांना विधानपरिषदेवर घेण्याची मागणी केली होती. त्यामुळे निवड झाल्यास भाजपमध्ये प्रवेश करण्याचा झालेला पश्चाताप पाटील यांचा दूर होणार आहे .काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडुन सतत दगाफटक्याचे राजकारण केले जात असल्याचा आरोप करुन पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला होता .मात्र,राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी ताकद लावली होती. त्यामुळे विद्यमान आमदार सध्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्यांचा सलग दुर्सयांदा पराभव केला. त्यामुळे पाटील यांचे राजकीय पुनर्वसन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे .माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची भाजपच्या वतीने विधानपरिषदेत आमदार म्हणून वर्णी लागल्यास इंदापुर तालुक्याला तीन आमदार लाभणार आहेत. तालुक्याचे विद्यमान आमदार तथा राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, तालुक्यातील शेळगाव येथील रहिवासी व मोहोळ तालुक्याचे आमदार यशवंत माने सध्या कार्यरत आहेत.
...इंदापूरला मिळणार तिसरा आमदार? हर्षवर्धन पाटील यांची विधानपरिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2020 6:20 PM
बारामती लोकसभा मतदारसंघातील ताकद वाढविण्यासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची विधानपरिषदेत वर्णी लागण्याची शक्यता आहे .
ठळक मुद्देराज्यात विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या नऊ जागांसाठी निवडणूक जाहीर