पुणे : पुण्यात सध्या महापालिकेकडुन अनेक रस्ते स्मार्ट केले जात आहेत. पण त्यासठी चक्क झाडांचा बळी देण्यात आला आहे. पुण्याच्या सगळ्यात रहदारीच्या रस्त्यांपैकी एक फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर दोन मोठी झाडं कापण्यात आलीत. ही झाडं कापायची खरंच गरज होती का असा सवाल रहिवासी विचारत आहेत. पुण्यात रस्ता सुशोभीकरण सुरु आहे की पुण्यातली हिरवळ कशी कमी होईल यावर काम करणं , असा प्रश्न डेक्कन परिसरातील नागरिक करत आहेत.
फर्ग्युसन रस्त्यावर सकाळपासून ते रात्रीपर्यंत गर्दीचा ओघ असतोच. या भागात मार्केट, मॉल, कॅफे, बसस्टॉप असल्यानं गर्दी तर असतेच पण रुंद रस्ते असल्यानं आजूबाजूला बरीच हिरवळ आहे. जुन्या पुण्याची आठवण करुन देणाऱ्या या रस्त्यावर अनेक जुनी आणि मोठी झाडं आहेत. नागरिकांनाही या परिसरात फिरायला नेहमीच आवडतं. पण याच हिरवळीवर आता कुऱ्हाड चालवली गेली आहे. फर्ग्युसन रस्त्याच्या निर्मितीवेळी बरीच झाडं कापल्या गेली होती. त्यानंतर आता फुटपाथ सुशोभीकरणाच्या नावे झाडं तोडली गेलीयेत. सुशोभीकरणासाठी उभारल्या जाणाऱ्या कमानींना अडथळा ठरणारी दोन मोठी झाडं महापालिकेकडुन कापली गेली आहेत. यालाच डेक्कन जिमखाना परिसर समितीच्या नागरिकांनी आक्षेप घेतला आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार” 'ही झाडं अचानक आणि कुणालाही न सांगता तोडल्या गेली आहेत. रस्ते किंवा फुटपाथचं सुशोभीकरण म्हणजे गरम वातावरण निर्माण करणारे लोखंडी खांब रोवणे आहे का? हे कोणतं सुशोभीकरण आहे? नैसर्गिक गोष्टी संपवून आमच्या परिसरात सुशोभीकरण आम्हाला मान्य नाही. फुटपाथवर चालायला नीट जागा कधीच नसते. नेहमी कुणी ना कुणी आपले स्टॉल, काही विक्रीचं समान घेऊन बसलेले असतात. हे रंगीबेरंगी उभे खांब लावून काय साध्य होणार आहे? ते आधी सांगावं की हे कोणत्या प्रकारचं सुशोभीकरण आहे? आज सामान्य माणसानं झाडाची एक फांदी कापली की त्याला महापालिका दंड करते. मग ही झाडंच कापून टाकायला त्यांना कोण दंड करणार?
पुणे महापालिकेने मात्र ही झाडं तोडणे योग्यच असल्याची भूमिका घेतली आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र झाडे कापण्याचे समर्थन केले आहे. उद्यान विभागाचे प्रमुख अशोक घोरपडे यांच्या मते ही झाडे अडथळा ठरत असल्याने नाही तर जीर्ण झाल्यामुळे कापली गेली आहेत.