लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यातील रिक्षा प्रवास महागण्याची दाट शक्यता आहे. प्रादेशिक परिवहन समितीबरोबर झालेल्या बैठकीत सर्वच रिक्षा संघटनांनी खटूवा समितीच्या अहवालाच्या शिफारसी लागू करण्याची मागणी केली. त्याची अंमलबजावणी येत्या १० ते १५ दिवसांत होण्याची शक्यता आहे. तसे झाले तर पुणेकरांना पहिल्या दीड किमीसाठी २३ रुपये आणि त्या नंतरच्या प्रत्येक एक किमीसाठी १५ रुपये दर आकारण्यात यावा, अशी मागणी रिक्षा संघटनांनी केली.
पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात रिक्षा संघटना व आरटीओ प्रशासन यांच्यात बैठक झाली. यात भाडेवाढीवर चर्चा झाली. सर्वच रिक्षा संघटनांकडून भाडेवाढीची मागणी करण्यात आली आहे. अद्याप यावर निर्णय जरी झाला नसला तरी मागील सहा वर्षांपासून दरवाढ झालेली नसल्याने यंदा ती होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. सध्या पहिल्या दीड किमीसाठी १८ रुपये आणि त्या नंतरच्या प्रत्येक एक किमीसाठी १२.३१ रुपये दर आकारला जात आहे. रिक्षा दरवाढीला मंजुरी मिळाली तर पुणेकरांचा रिक्षा प्रवास महागणार आहे.
----------------------------
आरटीओ अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत आम्ही भाडेवाढीची मागणी केली आहे. मागील सहा वर्षांपासून पुण्यात दरवाढ झालेली नाही. या दरम्यान पेट्रोलच्या इंधनात मोठी वाढ झाली. हे लक्षात घेता भाडेवाढ गरजेचे आहे.
बापू भावे, खजिनदार, पुणे शहर रिक्षा फेडरेशन