पुणे : कोरोना विरोधातील लसीचा एक डोस घेणाऱ्यांनाही दिवाळीनंतर प्रवास करण्यासाठी मुभा मिळणार असल्याचे संकेत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिले होते. त्यावर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharti Pawar) यांनी मात्र काहीस वेगळं उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, हा वायरस आहे. येथे राजकीय मत मांडून चालत नाही. यावर तज्ञ काम करत असतात, त्यामुळे असे निर्णय घेताना तज्ञांची मते महत्वाची असतात. आमच्याकडून तरी याबद्दल काही सांगण्यात आले नाही. पुणे महानगरपालिकेत (Pune Mahanagarpalika) आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
डॉ भारती पवार यांनी यावेळी कोरोना काळात पुणे महानगरपालिकेने केलेल्या कामाचे कौतुक देखील केले आहे. त्या म्हणाल्या, मी खास पुणे महापालिकेच्या भेटीसाठी आले आहे. कोरोना काळात महापालिकेच्या टीमने चांगले काम केले. त्यांच्या कामाची पद्धत जाणून घेण्यासाठीच मी याठिकाणी आले आहे. केंद्र शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार काम करत त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या हॉस्पिटल संदर्भातील तक्रारी देखील दूर करण्यात आल्यात. जवळपास साडेसहा कोटी रुपयांची बिलं कमी करण्यात आली.
सणासुदीच्या काळात काळजी घेण्याचे आवाहन
''पुणे जिल्ह्याने आतापर्यंत एक कोटी लसीकरण पूर्ण केले आहे. येथील रुग्ण संख्या वाढू नये यासाठी केंद्र सरकार बारकाईने लक्ष ठेवून आहे. लहान मुलांच्या बाबतीत विशेष खबरदारी घेतली जात असून त्यांच्या लसीकरण चाचण्या सुरू आहेत. आता जरी कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाली असली तरी महापालिकेकडून जनजागृती प्रभावीपणे राबवली जात आहे. सणासुदीच्या काळात काळजी घेण्याचे आवाहनही केले जाते. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला 220 कोटींचा निधी आलेला आहे असेही पवार यावेळी म्हणाल्या आहेत.''