"आम्ही मेल्यावर फेलाेशिप देणार का?" ‘बार्टी’समाेर संशाेधक विद्यार्थ्यांचे आमरण उपाेषण
By प्रशांत बिडवे | Published: September 21, 2023 06:54 PM2023-09-21T18:54:02+5:302023-09-21T18:54:38+5:30
फेलाेशिप दिल्याशिवाय आंदाेलन मागे घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला....
पुणे : अनुसुचित जाती प्रवर्गातील पीएच.डी साठी नाेंदणी केलेल्या सर्व संशाेधक विद्यार्थ्यांना संशाेधन अधिछात्रवृत्ती (फेलाेशिप) देण्यात यावी या मागणीसाठी बार्टी कार्यालयासमाेर दि. २० पासून आमरण उपाेषणास सुरूवात केली आहे. आम्ही यापूर्वी अनेकदा आंदाेलन केले मात्र, मागणी मान्य झाली नाही. आम्ही मेल्यावर सरकार फेलाेशिप जाहीर करणार का? असा संतप्त सवाल आंदाेलकानी केला. तसेच फेलाेशिप दिल्याशिवाय आंदाेलन मागे घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
राज्यातील सारथी, महाज्योती या संस्थेने कोणतीही परीक्षा, मुलाखत न घेता सर्व विद्यार्थांना सरसकट फेलोशिप मंजूर केली आहे. त्याचबरोबर मागच्या वर्षी बार्टीनेही नाेंदणी केलेल्या सर्व संशोधनक विद्यार्थांनाही सरसकट फेलोशिप मंजूर केली होती त्याच धर्तीवर २०२२ मध्ये पीएच.डी साठी नाेंदणी केलेल्या सर्व संशोधक विद्यार्थ्यांना फेलाेशिप मिळाली पाहिजे अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.
फेलाेशिपच्या मागणीसाठी यापूर्वी अनेकदा आंदाेलन केले आहेत. मंत्र्यांना तसेच बार्टीच्या महासंचालकांना वेळाेवेळी निवेदनेही दिले आहेत. जोपर्यंत फेलाेशिप अवॉर्ड लेटर अणि फेलोशिप ची रक्कम खात्यात जमा होत नाही तोपर्यंत उपोषण सुरु ठेवणार असल्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी केला आहे. या आंदाेलनात संभाजीनगर, नागपूर, नांदेड, लातूर, परभणी औरंगाबाद या जिल्ह्यातून आंदाेलक एकत्र आले आहेत. त्यामध्ये रेखा इंगळे, दिलीप वाघमारे, सचिन गणकवार, दयानंद जयानवार, प्रतीक झाडे, विजया नगराळे, आदित्य राऊत, अमोल देशमुख, प्रशांत साबणे, प्रसेनजीत कांबळे, सरला पानतावणे, कुमार चौधरी, सिद्धार्थ काटकोळे, कैलास गायकवाड, अविनाश आगळे आदींनी सहभाग घेतला.
मी अकाेल्याहून आले आहे. मला पीएच.डी पूर्ण करून शैक्षणिक क्षेत्रात करिअर करायचे आहे. पीएच.डीसाठी अर्थसहाय्य स्वरूपात फेलाेशिप मिळावी यासाठी मी लढा देत आहे.
- रेखा इंगळे, अकाेला
आम्ही संशोधक विद्यार्थी राज्यभरातून एकत्र येउन आमच्या हक्कासाठी लढा देत आहोत. हे तीसरे आंदोलन आहे यापूर्वी केलेल्या आंदोलनात बार्टी प्रशासनाकडून खोटी आश्वासन देऊन आंदोलन मागे घ्यायला लावले. मात्र, यावेळी मागणी मान्य होत नाही तोपर्यंत हे अमरण उपोषण सुरु राहील.
- कल्याणी वाघमारे - संशोधक विद्यार्थिनी