पुणे : श्रावण महिना ९ ऑगस्टपासून सुरू होत आहे, ७ सप्टेंबरला महिना संपत आहे. श्रावण महिना अर्थात सणवार, व्रतवैकल्ये, पूजाअर्चेचा महिना...श्रावणी सोमवारी महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी रांग लागते. लॉकडाऊनमुळे मंदिरे बंद आहेत. कोरोनामुळे यंदाच्या श्रावणात तरी मंदिरात प्रवेश मिळणार का, असा प्रश्न भाविकांकडून उपस्थित केला जात आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी राज्य शासनाने अद्याप निर्बंध पूर्णपणे हटवलेले नाहीत. त्यामुळे धार्मिक स्थळे बंद आहेत. जिल्ह्यात श्रावणी सोमवारी भुलेश्वर, भीमाशंकर, नसरापूर या ठिकाणी तर शहरात मृत्युंजयेश्वर, पाताळेश्वर, ओंकारेश्वर, पांचाळेश्वर, सिध्देश्वर या शंकर महादेवाच्या मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मंदिरांबाहेर फळे, फुले, हार, नारळ, पूजेचे ताट, प्रसाद आदी वस्तूंची खरेदी होते आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. यंदा मंदिरे बंद असल्याने आजूबाजूला असलेल्या व्यावसायिकांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे. त्यामुळे मंदिरे लवकरात लवकर खुली व्हावीत, अशीच इच्छा त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे.
श्रावणात अनेक सणवार साजरे केले जात असल्याने वातावरण प्रसन्न झालेले असते. मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याने सकारात्मकता मिळते, प्रसन्न वाटते. सरकारने अनेक सार्वजनिक ठिकाणांवरील निर्बंध उठवले आहेत. दुकाने, हॉटेल सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. मग, धार्मिक स्थळांबद्दलच अद्याप निर्णय घेण्यास सरकार विलंब का करत आहे, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
----------------
श्रावण सोमवार
पहिला - ९ ऑगस्ट
दुसरा - १६ ऑगस्ट
तिसरा - २३ ऑगस्ट
चौथा - ३० ऑगस्ट
पाचवा - ६ सप्टेंबर
--------------
दर वर्षी श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. आमच्यासारख्या अनेक व्यावसायिकांचा उदरनिर्वाह पूजा साहित्याच्या विक्रीवर अवलंबून असतो. श्रावण महिन्यात मंदिर परिसरात भाविकांची रेलचेल असते, वातावरणात जिवंतपणा आलेला असतो. हार-तुरे, फळे, फुले, नारळ, पूजा साहित्य अशा अनेक वस्तूंची विक्री होते. श्रावणात एका दिवशी साधारणपणे १००० रुपयांची, तर श्रावणी सोमवारी १८००-२००० रुपयांच्या साहित्याची विक्री होते. गेल्या दीड वर्षापासून मंदिरे बंद असल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
- भानुदास सोनवणे, व्यावसायिक