पुणे :आजारी आणि वयोवृद्ध आई वडिलांचा स्वीकार करणारी बायको मिळत नसल्याच्या कारणावरून निराश झालेल्या तरुणाने थेट मुख्यमंत्र्यांकडे इच्छा मरणाची मागणी केली आहे. तरुणाने या संदर्भात लिहिलेल्या पत्राची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना त्याची समजूत काढण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, 32 वर्षांचा हा तरुण पुण्यातील दत्तवाडी भागात आई वडिलांसोबत वास्तव्यास आहे. त्याच्या आईला पार्किन्सन आजार असून वडिलांचे वय 85 वर्ष आहे. या दोघांचीही जबाबदारी त्याच्यावर असून तो त्यांची काळजी घेत आहे. दरम्यान, त्याच्याकडे स्वत:चे घर असून चांगल्या पगाराची नोकरी आहे.अशा स्थितीत एक सुयोग्य जोडीदार मिळावी यासाठी त्याने शोध सुरू केला.मात्र आजारी आई आणि वयोवृद्ध वडील आहेत समजल्यावर प्रत्येक मुलीने त्याला नकार दिला आहे.अखेर हा तरुण निराशेच्या गर्तेत सापडला आणि त्याने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. या काळात आत्महत्येचे विचारही त्याच्या मनात आले.मात्र, आत्महत्या गुन्हा आहे असे समजल्यावर त्याने मुख्यमंत्र्यांकडे इच्छामरणाची मागणी केली. मुख्यमंत्री कार्यालयानेही या पत्राची दखल घेतली असून दत्तवाडी पोलीस स्टेशनचे देवीदास घेवारे यांनी तरुणाचा शोध घेऊन समजूत काढली आहे. अखेर मोठे प्रयत्न केल्यावर या चचेर्ला यश आले आहे असेही त्यांनी सांगितले.
विवाहेच्छुक तरुणाची इच्छामरणाची मागणी : मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 12:36 PM