त्यांच्या मेहनतीवर मारली जाते पाच मिनिटात पिचकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 03:14 PM2018-05-29T15:14:45+5:302018-05-29T15:14:45+5:30
पुण्यातील बंड गार्डन भागात दुभाजकांचे रंगकाम करण्यात येत अाहे. त्यावर काही समाजकंटकांनी थुंकून ते दुभाजक खराब केले अाहेत.
राहुल गायकवाड
पुणे : वेळ सकाळी साधारण 11 वाजताची. उन्हाचा तडाखा वाढत हाेता. वाहनांची संख्याही हळूहळू वाढत हाेती. हातात रंगाचा डब्बा घेऊन दुभाजकांना रंग देण्याचं काम दाेघे प्रामाणिकपणे करत हाेते. एक एक दुभाजक ते रंगवत हाेते अाणि काही समाजकंटक पान-गुटखा खाऊन त्या दुभाजकांवर पिचकारी मारत हाेते. अापल्या मेहनतीवर काही मनिटात मारली जाणारी पिचकारी पाहून त्यांचे मन हेलावत हाेते. दादा करणार तरी काय, अन बाेलणार तरी काेणाला....वाईट तर वाटतं पण अाता लाेकांना अडवू तर शकत नाही. अापल्या मेहनतीवर पाणी फिरल्याचं पाहत पुढे सरकत रहायचं एवढंच अामच्या नशीबात...बंडगार्डन येथे दुभाजकांना रंगकाम करणारे दाेन कामगार बाळू गवळी अाणि कैलास नलावडे अापली व्यथा मांडत हाेते.
सध्या पुण्यातील बंडगार्डन भागातील दुभाजक रंगवण्याचं काम चालू अाहे. राष्ट्रपती रामनाथ काेविंद हे एका कार्यक्रमासाठी बुधवारी पुण्यात येणार अाहेत. त्यांच्या वाहनांचा ताफा विमातळावरुन याच ठिकाणावरुन जाणार अाहे. स्वच्छ पुणे सुंदर पुणे हे पुण्याचे ब्रिदवाक्य राष्ट्रपतींना खरे वाटावे म्हणून खरंतर हा खटाटाेप. परंतु या रंगकाम करणाऱ्यांच्या मेहनतीवर काही समाजकंटक पाणी फिरवत असल्याचे चित्र अाहे. काल निळ्या व पांढऱ्या रंगाने रंगवलेल्या दुभाजकांना काही वाहनचालकांनी अापल्या अावडत्या लाल रंगाने रंगवले हाेते. अाज सकाळी हे कर्मचारी रंगकाम करत असतानाच काही वाहनचालक त्यांच्यासमाेरच त्यांनी रंगवलेल्या दुभाजकांवर थुंकत हाेते. हे चित्र पाहण्यापलिकडे दुसरा कुठलाच उपाय त्यांच्याकडे नव्हता. राेज सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत जीवाच रान करुन हे कर्मचारी दुभाजक रंगवतात. दिवसभर राबल्यानंतर अवघे चारशे रुपये त्यांच्या हातात पडतात. परंतु त्यांनी केलेल्या कामावर पिचकाऱ्या मारलेल्या पाहून या कर्मचाऱ्यांना अत्यंत दुःख हाेते. पाेटाची खळगी भरण्यासाठी गपगुमान अापले काम करत राहण्याशिवाय यांच्याकडे कुठलाही पर्याय नाही.
हे रंग काम करणारे बाळू गवळी म्हणाले, काही मिनिटापूर्वीच मागील दुभाजक रंगवले हाेते. परंतु काही वाहनचालकांनी गुटखा थुंकून ते घाण केले. त्यांना अाम्हाला काही बाेलता येत नाही. काही उर्मट वाहनचालक तर अामच्या समाेर हसत अाम्ही रंगवलेल्या दुभाजकांवर पिचकारी मारत निघून जातात. अापलं काम खराब हाेतंय हे पाहून दुःख तर हाेतं मात्र काही करताही येत नाही.
या कर्मचाऱ्यांचे मुकादम सुभाष सांळुखे म्हणाले, सकाळपासून हे कर्मचारी येथे दुभाजक रंगविण्याचे काम करीत अाहेत. वाहने वेगात येत असताना जीवाची पर्वा न करता हे कर्मचारी काम करतात. परंतु काही लाेक पिचकाऱ्या मारुन यांच्या मेहनतीवर पाणी फिरवतात. एखाद्याला बाेललं तर ते अाम्हालाच दमदाटी करतात. अाता थुंकणाऱ्यांचे ताेंड तर बंद करता येत नाही. त्यामुळे सहन करण्याशिवाय अामच्याकडे पर्याय नाही.
शहराच्या विविध भागात सारखीच परिस्थिती अाहे. दुभाजकांवर पानमसाला, गुटखा खाऊन थुंकून खराब केले अाहे. त्यामुळे माेदींच्या स्वच्छ भारत अभियानाअाधी स्वच्छ विचार अभियान राबविण्याची गरज असल्याचे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे अाहे.