महिलेला रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आपला प्राण गमवावा लागला आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:14 AM2021-06-16T04:14:30+5:302021-06-16T04:14:30+5:30
भाग्यश्री श्रीकृष्ण प्रभुणे (वय २८, रा. सिद्धेश्वर गल्ली बारामती) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे, तर श्रीकृष्ण प्रभुणे ...
भाग्यश्री श्रीकृष्ण प्रभुणे (वय २८, रा. सिद्धेश्वर गल्ली बारामती) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे, तर श्रीकृष्ण प्रभुणे (वय ३८) असे जखमी झालेल्यांचे नाव आहे.
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर भाग्यश्री आणि त्यांचे पती श्रीकृष्ण हे दोघे रविवारी त्यांच्या हिरो होंडा दुचाकीवरून (एमएच ४२ एसी २२६०) थेऊर येथील श्री चिंतामणीचे दर्शन घेऊन घरी परतत होते. त्यांनी कुंजीरवस्ती येथे एका वाहनाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला. परंतु रस्त्यावर असलेल्या एका मोठ्या खड्ड्यात त्यांचे दुचाकीचे पुढील चाक गेल्याने त्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असताना ती घसरली. यामुळे श्रीकृष्ण हे रस्त्याच्या डाव्या बाजूला पडले, तर त्यांची पत्नी भाग्यश्री या रस्त्याच्या उजव्या बाजूला पडल्या. या वेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरचे (एमएच ४६ एच ४८९७) चाक भाग्यश्री यांच्या पाठीमागून भरधाव वेगात आला व काही समजण्याच्या आत त्याचे पुढील चाक भाग्यश्री यांच्या अंगावरून गेले. यामुळे त्या जागीच मृत्युमुखी पडल्या. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शखाली सहायक पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी करीत आहेत.
--
चौकट
पुणे-सोलापूर महामार्गावरून पुणे-नगर महामार्गावर जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून अवजड वाहनचालक या रस्त्यास पसंती देतात. परंतु सुमारे दोन वर्षांपासून महामार्ग ते थेऊर यादरम्यानच्या रस्त्यावर सुमारे तीन वर्षांपासून मोठमोठे खड्डे पडले असल्याने या पाच किलोमीटर परिसरात वाहन चालवताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. परिणामी अपघात होतात. त्यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. अनेकांचे प्राण गेल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. याला नेमके जबाबदार कोणाला ठरवायचे? हा एक प्रश्न अनुत्तरित राहत आहे.
--