मंचर (पुणे) : पोलीस असल्याची बतावणी करून चांडोली खुर्द येथे पानटपरीचालक महिलेला दोन भामट्यांनी फसवून १ लाख १० हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केले. याप्रकरणी मंदा बाबाजी इंदोरे यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
यासंदर्भात मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी मंदा इंदोरे या आपल्या पानटपरीवर व्यवसाय करत असताना दोन दुचाकीस्वार इंदोरे यांच्या पानटपरीजवळ येऊन थांबले. इंदोरे यांना म्हणाले, आम्ही पोलीस आहोत. तुमच्या भागात मोठ्या प्रमाणावर चोऱ्या होत आहेत. तुम्ही अंगावर दागिने घालू नका. तुमच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, कानातील वेल व कुड्या काढून एका कागदात बांधून घरी नेऊन ठेवा, असे सांगितले. इंदोरे यांनी हे इसम पोलीस आहेत असा विश्वास ठेवून गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, कानातील वेल व कुड्या काढून एका कागदात बांधल्या. त्या इसमांनी ती पुडी आमच्याकडे द्या, त्यावर मार्किंग करावी लागेल, असे सांगितले.
दुचाकीवर मागे बसलेल्या इसमाने इंदोरे यांच्या हातातील पुडी घेतली व त्यावर काहीतरी लिहिले व परत कागदाची पुडी दिली व दोघेजण दुचाकीवर मंचर बाजूला निघून गेले. त्यानंतर कागदाची पुडी घरी घेऊन घराच्या ओट्यावरच उघडून पाहिले असता, त्यामध्ये लहान लहान दगडाचे खडे होते. त्यामुळे इंदोरे या घाबरल्या, त्यांच्या लक्षात आले की दुचाकीवरील इसमाने कागदाची पुडी बदलून सोने असलेली पुडी घेऊन गेला. यामध्ये ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मनी मंगळसूत्र, ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे वेल व कुड्या, असा १ लाख १० हजार रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज भामट्यांनी लंपास केला आहे. मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तपास मंचर पोलीस करीत आहेत.