Pune: सुरक्षा रक्षकाची नोकरी नाही दिली म्हणून पेटवली महिलेची कार; येवलेवाडीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 05:59 PM2023-07-22T17:59:03+5:302023-07-22T17:59:47+5:30
५०० रुपये गुगल पेवर देण्याचीही मागणी...
पुणे : शासकीय संस्थेतील कंत्राटदाराकडे त्याला सुरक्षा रक्षकाची नोकरी हवी होती. ती दिली नाही या रागातून त्याने चक्क संबंधित महिलेची चारचाकी जाळली. याप्रकरणी निरजदेवी विरेंद्रसिंग यादव (वय ४०,रा. बंडोरवाला शासकीय कुष्ठरोग रुग्णालय, येवलेवाडी) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रोहित पाटील याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १२ जुलै २०२३ रोजी पहाटे ५ वाजता घडला.
अधिक माहितीनुसार, फिर्यादी यांची भागीदारीत सिक्युरिटी एजन्सीचा व्यवसाय आहे. येवलेवाडी येथील बंडोरवाला शासकीय कुष्ठरोग रुग्णालयात त्यांच्या एजन्सीचे सुरक्षा रक्षक आहेत. त्या ११ जुलै रोजी भुसावळला असताना त्यांना रोहित पाटील असे नाव सांगणाऱ्याने फोन करून नोकरी मागितली. त्यांनी आता जागा नाही, जागा असेल तेव्हा कळविते, असे सांगितले. त्यानंतर त्याने ५०० रुपये गुगल पेवर द्या, असे सांगितले. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यावर त्याने तुमची गाडी पेटवून देतो, असे सांगितले. त्यानंतर तो कुष्ठ रोग हॉस्पिटल जवळच थांबला होता. १२ जुलै रोजी पहाटे ५ च्या सुमारास संस्थेच्या मुख्य गेटजवळ फिर्यादी यांची चारचाकी गाडी उभी होती. तिला रोहित पाटील याने पेटून दिली. पोलिस उपनिरीक्षक सोनवणे तपास करीत आहेत.