- दीपक कुलकर्णी ‘‘वयाच्या सतराव्या वर्षी हिंदी सिनेमासृष्टीत गायिका होण्यासाठी आले; पण त्या वेळी लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्यासारख्या तगड्या गायिकांच्या आव्हानासमोर निभाव लागणे अशक्यप्राय वाटू लागले. आणि मग स्वत:च्या ध्येयाला थोडी कलाटणी देत सिनेमासृष्टीत संगीतकार म्हणून काम करण्याचे ठरविले. या पाच-सहा दशकांच्या कालावधीत अनेक सिनेमांना संगीत देण्याचे भाग्य लाभले. तरीदेखील रसिकांनी माझ्या सांगीतिक योगदानाला पूर्णपणे स्वीकारले नसल्याचे मनात होते; पण मागच्या वर्षी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मान झाला. हा पुरस्कार म्हणजे रसिकांचीच वाहवा असल्याची भावना मनात दाटून आली,’’ अशा भावना हिंदी सिनेमासृष्टीतील ज्येष्ठ संगीतकार उषा खन्ना यांनी व्यक्त केल्या.संगीतकार म्हणून गाजवलेल्या प्रदीर्घ कारकिर्दीविषयी काय वाटते?ल्ल गायिका होण्याचे स्वप्न गुंडाळून संगीतकार म्हणून काम करण्याचा धाडसी निर्णय घेतला. कुटुंब काळजीत होते; पण वडिलांच्या पाठिंब्यामुळे बिनधास्तपणे स्वत:ला अजमावत राहिले. जे-जे काही नावीन्यपूर्ण करता आले ते-ते केले. आपण केलेल्या कामांना रसिकांचा दाद मिळाली, ही भावना लता मंगेशकर पुरस्कारामुळे जागृत झाली. संगीतकार म्हणून काम करताना निर्माता, दिग्दर्शक आणि रसिक अशा अनेकांची मने जिंकण्याची कला आत्मसात करता आली.सध्याच्या ‘रिमिक्स’ गाण्यांबद्दल संगीतकार म्हणून काय वाटते?ल्ल जुन्या गाण्यांना धांगडधिंगा स्वरूपात संगीतबद्ध करीत ‘रिमिक्स’ नावाने अशी गाणी सिनेमात वापरण्यात येतात. काही काळ तरुणाई या गाण्यांना डोक्यावरसुद्धा घेते; पण त्यांना श्रवणीय दर्जा नसतो. तसेच, जुन्या गाण्यांची आवश्कता भासणे हे नव्याची कल्पनानिर्मिती हरवत चालल्याचे लक्षण आहे. परंतु, ही गाणी रसिकांच्या मनावर जास्त काळ अधिराज्य गाजवू शकत नाहीत. ती काळाच्या ओघात हरवून जाणार, हे नक्की. जुन्या गाण्यांचा दर्जा आजदेखील टिकून राहण्यामागे त्या वेळी गीतकार आणि संगीतकार व वाद्यवृंद यांनी घेतलेली अविरत मेहनत हे मूळ कारण आहे.महिला संगीतकार म्हणून काम करताना अडचणी आल्या ?ल्ल संगीतक्षेत्रात तेव्हा पुरुषांची मक्तेदारी होती. तरी दिग्गजांसोबत शिकत काम करीत राहिले. लतादीदी, आशा भोसले, मन्ना डे, मोहंम्मद रफी यांच्यासोबत काम करता आले. ही सर्व मंडळी महान होती. असे कलाकार पुन्हा होणे नाही. अरिजित सिंग, श्रेया घोषाल, सोनू निगम, अलका याज्ञिक ही मंडळी रिअॅलिटी शोमधून पुढे आली; परंतु त्यांनी पैशाला आपले ध्येय बनू दिले नाही. आपल्या गाण्यावर ते सतत मेहनत घेत राहिले. त्यामुळेच ते आज यशाच्या उंच शिखरावर पोहोचले आहेत.संगीतकार म्हणून करियरची निवड करताना महिला अजूनही तितक्या सक्षमपणे समोर येत नाहीत. महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी मी नेहमीच तयार आहे. महिलांनी संगीतकार म्हणून कारकीर्द घडविण्यात कोणताही न्यूनगंड बाळगू नये. पुरुषांची मक्तेदारी असतानाही मला या क्षेत्रात काम करताना अडचण आली नव्हती.
‘संगीतकार’ होण्यात स्त्रियांना रस नाही - उषा खन्ना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2020 10:37 PM