मंगळसूत्र आणण्यासाठी महिलेला चटके दिल्याने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 04:04 PM2018-08-18T16:04:48+5:302018-08-18T16:14:27+5:30
माहेरहून पहिल्या पतीचे मंगळसूत्र आणण्यासाठी पतीसह सासरे, दीर व सासू यांनी मारहाण केली होती. तसेच तिच्या शरीरावर चटके देऊन तिला जखमी केले होते.
देहूरोड : चिंचोली येथील महिलेला तिच्या पतीसह सासू , सासरा व दीर यांनी माहेराहून पहिल्या पतीचे मंगळसूत्र आणण्यासाठी मारहाण करून चटके दिल्याने पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला असून देहूरोडपोलिसांनी संबंधित महिलेचा पती , दीर, सासरे व सासू या चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, संबंधित महिलेचा पती फरार असून सासरा व दिरास अटक केली आहे. शनिवारी दोघांना दुपारी न्यायालयासमोर हजार केले जाणार आहे .
मोनिका सोमनाथ जाधव ( वय ३१ , रा चिंचोली , पोस्ट देहूरोड ता हवेली जिल्हा पुणे ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिची आई शांता रमेश पवार (वय ५१ , रा चव्हाण बिल्डिंग, विठ्ठलनगर, वारजे,पुणे ) यांनी फिर्याद दिली असून तिचा पती सोमनाथ नारायण जाधव, सासरे नारायण तुकाराम जाधव, सासू लक्ष्मीबाई नारायण जाधव व दीर गणेश नारायण जाधव (सर्व रा चिंचोली, देहूरोड , पुणे )या चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनिकाचे चिंचोली येथील सोमनाथ जाधव यांच्याशी दुसरे लग्न झालेले होते. तिच्या माहेरहून पहिल्या पतीचे मंगळसूत्र आणण्यासाठी पतीसह सासरे, दीर व सासू यांनी मारहाण केली होती. तसेच तिच्या शरीरावर चटके देऊन तिला जखमी केले होते. याबाबत तिच्या आईने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता . दरम्यान, तिच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला आहे. मोनिकास व तिच्या जावेस दोन लहान मुले असून त्यामुळे सासूला अटक करण्यात आलेली नाही . मोनिकाच्या प्राप्त झालेल्या शवविच्छेदन अहवालानुसार चटके दिल्याच्या जखमांमुळे तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून त्यानुसार संबंधित चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक छाया बोरकर करत आहेत.