लोणावळा : मळवली( ता. मावळ) येथील 'समृद्धी' बंगला याठिकाणी शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास स्पिकरचा मोठ्या आवाजावर नाचणार्या महिला व त्यांच्यावर पैशाची उधळण करणारे पुरुष अशा नऊ जणांवर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मळवली येथील समृद्धी बंगल्यात सदरचा प्रकार सुरू असल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक नवनित काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे, पोलीस नाईक विजय रहातेकर, पोलीस काँन्स्टेबल शरद जाधवर, महिला पोलीस काँन्स्टेबल रूपाली कोहिनकर यांनी दोन पंचासह बातमीचे ठिकाणी जाऊन खात्री करून रात्री ११. १० वाजता छापा टाकला असता या ठिकाणी ४ महिला स्पिकरवरील गाण्याच्या तालावर अश्लील नृत्य करीत होते व ५ पुरुष त्यांच्यावर पैसे उधळत असल्याचे मिळून आले.
राजेश पारसमल जैन (राहणार लॅमिंग्टन रोड मुंबई), महेश छगनलाल पोरवाल, विनोद कुमार मोहनलाल भन्साळी, सचिन रमेश जैन व राकेश मदनलाल पोरवाल (सर्वजण राहणार बिजापूर, कर्नाटक) अशी याठिकाणी महिलांवर पैसे उधळणार्या इसमांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातील व नाचणार्या महिलांवर उधळलेले असे 50 हजार 880 रुपये रोख, मोबाईल, स्पीकर असे एकूण 1 लाख 40 हजार 880 रुपयांचा माल रोख रकमेसह जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात वरील पाच जणांसह चार महिलाच्या विरुद्ध भादंवि कलम 294, 188, 269 साथीचे रोग नियंत्रण कायदा सन 1897 चे कलम 3 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135, 33(N)/131 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत व पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सिताराम बोकड या घटनेचा तपास करत आहेत. मागील महिन्यात लोणावळ्यातील कुमार रिसाॅर्ट या हाॅटेलमध्ये खास जुगार खेळण्यासाठी आलेल्या 72 जणांवर लोणावळा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. देशात व राज्यात सर्वत्र कोरोनाचा कहर सुरू असताना काही चंगळवादी वृत्तीचे लोक शासनाच्या आदेशाची पायमल्ली करत अशाप्रकारची कृत्य करत स्वतःचे व समाजाचे आरोग्य धोक्यात घालत आहेत. सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी आवाहन केले आहे की, यापुढे असा प्रकार घडताना मिळून आल्यास संबंधित लोक व बंगला मालक यांचे विरुद्ध कठोर अशी कारवाई केली जाईल. तसेच नागरिकांनी आपल्या आजुबाजुला काही चुकीच्या घटना घडल असल्यास तात्काळ पोलीस विभागाशी संपर्क साधावा.