पुणे : मानसिक आजारांकडे आपल्याकडे फारसं गांभिर्याने बघितलं जात नाही. सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात ताण-तणाव, नैराश्य याने ग्रासलेले अनेकजण आहेत. या मानसिक आजारांवर लवकर आणि याेग्य उपचार न मिळाल्यास ते वाढण्याची शक्यता असते. परंतु आपल्याकडे मुळातच मानसिक आजारांकडे एखाद्या शाररीक आजारांप्रमाणे सामान्य म्हणून न पाहता एका वेगळ्याच चष्म्यातून पाहिले जाते. जेव्हा हे रुग्ण बरे हाेतात त्यानंतरही अनेकदा समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकाेन वेगळा असताे. याच मानसिक रुग्णांना समाजाने सर्वांप्रमाणेच एक आदराची वागणूक द्यावी आणि हे रुग्ण बरे हाेऊन त्यांच्या पायावर उभे रहावेत म्हणून पुण्यातील पाषाण भागात सुषुप्ती साठे आणि सुप्रिया शिंदे या दाेन रणरागिणींनी मानसिक रुग्णांसाठी एक कॅफे सुरु केला आहे. या कॅफेमध्ये मानसिक रुग्ण काम करत असून या माध्यमातून त्यांच्यात एक आत्मविश्वास निर्माण हाेत आहे.
पुण्यातील पाषाण भागात चैतन्य हेल्थ केअर सेंटर आहे. सुषुप्ती साठे या हे सेंटर चालवितात. विविध मानसिक आजाराने ग्रस्त लाेक त्यांच्या या सेंटरमध्ये राहून उपचार घेतात. उपचार घेत असतानाच या रुग्णांना समाजात एक स्थान निर्माण व्हावे, तसेच त्यांना एक आत्मविश्वास यावा यासाठी त्यांनी एक कॅफे सुरु करण्याचे ठरवले. त्यांची मैत्रीण सुप्रिया शिंदे या बेकींगमध्ये काम करत हाेत्या. सुषुप्ती यांनी त्यांची कॅफेची कल्पना सुप्रिया यांना सांगितली. त्यांना ही कल्पना खूपच आवडली. दाेघींनी मिळून कॅफे सुरु करण्याचा निर्णय घेतला. सुप्रिया यांना कॅफेसाठी लागणारे विविध पदार्थ केक, ब्रेड, बिस्किट्स हे बनविण्यासाठी येथील रुग्ण मदत करतात. अगदी सकाळी 9 पासून या सर्वांची पदार्थ तयार करण्यासाठीची लगबग असते. पदार्थ तयार केल्यानंतर त्याचे पॅकेजिंग, त्यावर किंमत टाकणे आदी सर्व कामे ही रुग्ण करतात. त्यानंतर कॅफेमध्ये हे सर्व पदार्थ विकण्यासाठी ठेवण्यात येतात. सकाळी 9.30 पासून ते रात्री 8 पर्यंत हा कॅफे सुरु असताे. येथील पाच रेसिडन्स हा कॅफे चालवितात.
या रुग्णांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि आत्मविश्वास बघून सुषुप्ती आणि सुप्रिया यांना समाधान वाटते. या रुग्णांना नुसते बरे नाही करायचे तर त्यांना एक आदर आणि त्यांच्या पायावर उभं राहण्याची हिम्मत देण्याच्या हेतूने हा कॅफे सुरु करण्यात आला आहे. या कॅफेमधून नफा मिळत नसला तरी या रुग्णांना हाेणारा आनंद हा कुठल्याही पैशात माेजण्यासारखा नाही असं दाेघी आवर्जुन सांगतात.