पौड - चांदे (ता. मुळशी) येथील वैष्णवी दादाराम मांडेकर आणि पुण्यातील अस्मिता जोशी या दोघी कराटेपटूंनी सहा इंची खिळ्यावर झोपून छातीवर एक हजार किलो वजनाच्या फरश्या फोडण्याचा नवा जागतिक विक्रम रचला आहे. अवघ्या ५.२४ मिनिटांत सर्व फरशा फोडण्याचा महिलाशक्तीचा हा थरार पुण्याच्या कॅम्प येथील नेहरू मेमोरियल हॉलमध्ये उपस्थितांनी अनुभवला. कराटे आणि बॉक्सिंगमध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मैदाने गाजविणाºया वैष्णवीने मुळशीचा झेंडा जगात फडकविला आहे. गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या विक्रमाची नोंद झाली आहे.शालेय वयापासूनच वैष्णवीला या खेळाची आवड होती. आतापर्यंत तिने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक मैदानेही गाजवून प्रथम क्रमांकाची बक्षिसे मिळविली. दोघींनीही या खेळात जागतिक विक्रम करण्याचा मानस सहा महिन्यांपासून आखला होता.तीन वर्षांपूर्वी महिला दिनाच्या दिवशी याच असोसिएशनच्या ऋतुजा दळवी, प्रार्थना कोठी, तन्वी शेठ, जागृती कोठकर या चौघींनीसहा इंची खिळ्यावर झोपून प्रत्येकी एक हजार किलोच्या फरश्या फोडण्याचा जागतिक विक्रम केला होता. त्याची गिनीज आणि लिम्का बुकमध्ये नोंद झाली. त्यापुढे एक पाऊल टाकीत नवीन विक्रम करण्यासाठी दोघींची मेहनत चालू होती.गुरुवारी (८ मार्च) दोघींचाही जागतिक विक्रम पाहण्यासाठी पुणे आणि मुळशीकरांची गर्दी झाली होती.साठ किलो वजनाची सहा इंची खिळ्याच्या फळीवर वैष्णवी पाठीवर झोपली. तिच्या पोटावर साठ किलो वजनाची सहा इंची खिळ्याची दुसरी फळी ठेवली. त्यावर अस्मिता पाठीवर झोपली.तिच्या अंगावर एक हजार किलोच्या फरश्या ठेवून प्रशिक्षक विक्रम मराठे यांनी ५ मिनिटे २४ सेकंदांत एक हजार फरशा फोडल्या. उपस्थित टाळ्यांचा गजर करीत दोघींचे धाडस वाढवीत होत्या. पाच मिनिटांच्या या काळात सर्वांचेच श्वास रोखले गेले होते. खिळ्याच्या फळीवर एकमेकीच्या अंगावर झोपून फरशा फोडण्याचे धाडस जगात यापूर्वी कुणा पुरुषानेही केले नव्हते. ते धाडस वैष्णवी आणि अस्मिताने करून अबला या सबला आहेत हे दुनियेला दाखवून दिले.
महिलाशक्तीचा थरार!, वैष्णवी मांडेकर व अस्मिता जोशी यांनी घडविला जागतिक विक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 5:46 AM