पुणे : संगीतातल्या जाणिवा काव्य लेखनासाठी उपयुक्त ठरत असल्याने शब्दांमध्ये दडलेले सूर नकळतपणे ऐकू येऊ लागतात. मनाच्या आंतरिकतेमध्ये एकप्रकारे संगीत सुरू असते, अशी शब्दांची सुंदरपणे गुंफण करणाऱ्या ज्येष्ठ गझलकार रमण रणदिवे यांच्या काव्यशब्दांमधून बहरलेल्या सुरांच्या अद्वैतामध्ये रसिक तादात्म्य पावले. मनासारखे कळते का?, तो गुलाबी वेदनांचा, तुझीच लाट शोधते अजून सागरात मी, अशा एकेक गझलांमधून शब्दरूपी फुलांची ओंजळ रसिकांसमोर रिती झाली.. आणि त्या सुमनांच्या सुगंधात रसिक देहभान हरपले.
निमित्त होते ज्येष्ठ गझलकार रमण रणदिवे यांच्या सत्तरीतील पदार्पणानिमित्त सर्वोत्कर्ष पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित ‘रेशीमधागे’ या काव्य आणि गझल मैफलीचे. भावगीतात भाव आणि गझलमध्ये रंग असतात. गझल सुखदु:खाची मिरवणूक नसते ते जीवनानुभवाचे छोटे छोटे तुकडे असतात. विविध वेगळे भाव गझलमध्ये उमटतात असे सांगून रमण रणदिवे एकीकडे गझलचे अंतरंग उलगडत होते आणि दुसरीकडे अनुराधा मराठे, राजेश दातार, योगीता गोडबोले यांच्या कंठस्वरातून रणदिवे यांच्या गझलचे शब्द रसिकांच्या हृदयाचा नकळतपणे ठाव घेत होते. शब्द आणि सुरांचा अद्वितीय संगम रसिकांनी मैफलीत अनुभवला. रणदिवे यांचे तीन सुपुत्र नीलेश, निखिल आणि नितीश रणदिवे मैफलीमध्ये वादनाची साथ करीत होते, हे या कार्यक्रमाचे वेगळेपण ठरले.चंद्र मागू कसा उधार तुझा, कळे ना लाजताना हा कसा रागावला चाफा या रचनेतील भाव अनुराधा मराठे यांनी स्वरांमधून सुंदरपणे व्यक्त केले. राजेश दातार यांनी मनासारखे कळते का?, तो गुलाबी वेदनांचा, जमेल तेव्हा जमेल त्याने जमेत घ्यावे गाणे या गझलचे सादरीकरण करून सायंकाळच्या गर्द अंधारात प्रकाशाची अनुभूतीदिली.तुझीच लाट शोधते अजून सागरात मी, रे सावळ्या घना बरसून जा, धुंद असू दे चंद्र नभिचा, धुंद असू दे रात्र या योगीता गोडबोले यांच्या स्वरांमध्ये रसिक हरवून गेले. श्रीपाद उंब्रेकर यांनी सुंदर संवादातून मैफलीची एकेक कडी गुंफली.कलाकाराच्या पाठीवर कौतुकाची थाप हवी४कलाकारांच्या पाठीवर आशीर्वादाच्या कौतुकाची थाप आणि मित्रांचा हातात हात असावा लागतो, अशी भावना रमण रणदिवे यांनी व्यक्त केली. शांताबाई शेळके यांनी पहिल्या गझलच्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली होती. त्यांच्याशी घरोब्याचे सूर जुळले होते.४कुणालाही विचार करून लिहिता येणार नाही अशा त्या बोलायच्या. त्या गोष्टी वेल्हाळ होत्या. पहिला संग्रह १९९० मध्ये आला. तेव्हा शंकर वैद्य, शांता शेळके, सुरेश भट, सुरेशचंद्र नाडकर्णी यांच्यासारख्या प्रज्ञावंतांच्या प्रकाशवनात माझी कविता पारखून घेता आली, याचा मनस्वी आनंद होतो. कलावंताने तृप्त असू नये विद्यार्थी राहायला हवे असे त्यांनी सांगितले.गटा-तटाचे राजकारणआज सर्वच क्षेत्रात गटा-तटाचे राजकारण आहे. कलाकारांनाही गटा-तटाच्या राजकारणाला सामोरे जावे लागते अशा शब्दांत रमण रणदिवे यांनी कलाकारांची व्यथा मांडली.माहिती नसणारेच कार्यशाळा घेतातगझलच्या तंत्राची माहिती नाही ते गझलच्या कार्यशाळा घेतात. स्वत: निसरड्या रस्त्यावर उभे आहेत आणि इतरांना आधार द्यायचा प्रयत्न करतात, असे सांगून त्यांनी तथाकथित गझलकरांना फटकारले.