पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर वारंवार अपघात होत आहे. तसेच या मार्गावर अनेकांना वेळवर उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी सरकारकडे आल्या आहेत. राज्य सरकारने यावर उपाययोजना करण्यासाठी आणि अपघातग्रस्त नागरिकांना तातडीने उपचार मिळावे यासाठी द्रूतगती महामार्गावर ओझर्डे (ता. मावळ) येथे ट्रामा केअर सेंटर आणि जखमींना वेळेवर रुग्णालयात नेण्यासाठी हेलिपॅड तयार करण्याचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना दिली. मागील पाच वर्षात एप्रिल २०१९ पर्यंत पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर एकूण १ हजार ४३६ अपघात झाले आहे. त्यामध्ये ५१८ जणांचा बळी गेला आहे. तसेच ५९३ जण गंभीररित्या जखमी झाले आहे. तर १२८ जण किरकोळ जखमी झाले आहेत, अशी माहितीही एकनाथ शिंदे यांनी दिली. सातत्याने घडणाऱ्या अपघाताबाबत विधान परिषदेमध्ये तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. द्रूतगती महामार्गावरील अपघातांमधील जखमींना तातडीने उपचार मिळण्यासाठी ट्रामा केअर सेंटर व हेलिपॅड उभारण्याचे २०१६ पासून प्रस्तावित केले आहे. याकामासाठी अडीच वर्षांपासून विलंब होत असल्याबाबतचा प्रश्न आमदारांनी विचारला होता. त्यावर उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, ओझर्डे येथे ट्रामा केअर सेंटर व हेलिपॅड बांधण्यासाठी निविदा प्रसिध्द केली होती. याठिकाणी ट्रामा केअर सेंटरसाठी ३ हजार ४०० चौरस फूट इमारत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे हस्तांतरीत केली आहे. तसेच हेलिपॅड बांधण्याचे कामही पूर्ण झाले आहे. ट्रामा केअर सेंटरसाठी महामंडळाने आॅपरेटिंग एजन्सीची नियुक्ती केली आहे. सध्यस्थितीत या इमारतीची डागडुजी करून ट्रामा केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. तसेच हेलिपॅड उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर ओझर्डेत हेलिपॅडचे काम पूर्ण : एकनाथ शिंदे यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 1:18 PM
मागील पाच वर्षात एप्रिल २०१९ पर्यंत पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर एकूण १ हजार ४३६ अपघात झाले आहे
ठळक मुद्देजखमींना मिळणार वेळेत उपचारजखमींना तातडीने उपचार मिळण्यासाठी ट्रामा केअर सेंटर व हेलिपॅड उभारण्याचे २०१६ पासून प्रस्तावित