वर्क फ्रॉम करताय, मग या चुका टाळाच...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:13 AM2021-07-14T04:13:23+5:302021-07-14T04:13:23+5:30
सध्या बहुतांश जण वर्क फ्रॉम होम म्हणजे घरून काम करत आहेत. त्यामुळे अनेक प्रकारचे विकार वाढत आहेत. प्रामुख्याने स्नायूंचे ...
सध्या बहुतांश जण वर्क फ्रॉम होम म्हणजे घरून काम करत आहेत. त्यामुळे अनेक प्रकारचे विकार वाढत आहेत. प्रामुख्याने स्नायूंचे विकार वाढत आहेत. घरून काम करताना स्नायू कंडरांचे आजार जसे की, टेनिस एल्बो किंवा गॉल्फर्स एल्बो यांसारख्या दुखण्यांनी अनेक जण बेजार झालेले दिसतात. आपल्या मनगटातील आणि बोटातील स्नायू व कंडरे खूप छोटी असतात. त्यामुळे त्यांना इजा होण्याची शक्यता वाढते.
टेनिस एल्बो :
कोपराच्या बाहेरील बाजूला सूज येणे व दुखणे अशी लक्षणे दिसून येतात. एक्स-रेमध्ये बऱ्याचदा कोणतीही अनैसर्गिकता दिसून येत नाही. कोपराच्या हालचालीसुद्धा योग्यरीतीने होत असतात. परंतु तरीही दुखणे जाणवते. फिजिओथेरपिस्ट यासाठी काही चाचण्या करतात. त्यानुसार उपचार दिले जातात. अल्ट्रासाउंड थेरपी ह्यात अतिशय उपयुक्त ठरते. तसेच स्नायूंची ताठरता कमी करण्यासाठीचे व्यायाम (stretching) सुद्धा फायदेशीर असतात.
गॉल्फर्स एल्बो
कोपराच्या आतील बाजूला सूज व दुखणे हे गॉल्फर्स एल्बोचे लक्षण आहे. बऱ्याचदा या भागाला दाबल्यास जोरात कळ येते. यासाठी फिजिओथेरपिस्ट सुरुवातीला स्प्लिंटचा वापर करून त्या भागाला आधार देतात. तसेच दुखणे कमी करण्यासाठी काही यंत्रांच्या साहाय्याने उपचार दिले जातात. यात बर्फाचा शेकसुद्धा फायदेशीर ठरतो. उपचारांमध्ये ताकद वाढवण्यासाठीचे व्यायाम आणि नंतर प्रतिकाराचा/ विरोधाचा वापर करून केलेले व्यायाम (Resisted Exercises) ह्यांचा समावेश होतो.
गॉल्फर्स एल्बो पायदुखी
हल्ली पायदुखी ही नवीन तक्रार घेऊन रुग्ण दवाखान्यात येऊ लागलेत. याला ढोबळमानाने रेस्टिंग लेग पेन सिन्ड्रोम असेही म्हणतात. घरून काम करताना सारखे एकाच स्थितीमध्ये बसणे, काम करताना मधे विश्रांती न घेणे, अपुरा व्यायाम, चुकीच्या प्रकारे बसण्याच्या सवयी यामुळे पायदुखीची सुरुवात होऊ शकते. चुकीच्या पद्धतीने बसल्याने स्नायूंमध्ये घट्टपणा येतो. तसेच अशक्तपणासुद्धा येतो. अशक्तपणाचं मुख्य कारण म्हणजे कमी पाणी पिणे. शरीराच्या सर्व स्नायूंना योग्य मात्रेत पाणी मिळणे गरजेचे असते. तसेच घरी आहोत म्हणून खाण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. उलट या काळात योग्य आहार अतिशय महत्त्वाचा आहे. जेवणाच्या वेळा आणि भरपूर पाणी पित राहणे या दोन गोष्टींनी शरीराची स्थिती उत्तम राहण्यास मदत होते. पायदुखीचं अजून एक कारण म्हणजे स्नायूंचा अयोग्य अतिवापर. चुकीच्या पद्धतीत बसून काम केल्याने नको त्या स्नायूंचा अतिवापर होतो. त्यामुळे स्नायूंच्या तंतूंमध्ये ताण निर्माण होऊन ते तुटू शकतात.
संगणकावर काम करणाऱ्यांनी खालील गोष्टींवर लक्ष द्यायला हवे
१) दोन्ही कोपरांकडे विशेष लक्ष द्या की, बोर्डच्या उंचीवर लक्ष द्या. कोपरं जर टेकलेली असतील वा त्यांना आधार मिळत असेल तर अधिकच चांगले. तसेच त्यांना ९० अंशाच्या कोनात ठेवलेले उत्तम. स्क्रीन शक्यतोवर डोळ्यासमोर असूद्या. स्क्रीनकडे बघण्यासाठी मान खाली-वर करण्याची गरज भासता कामा नये.
२) खालच्या खणातून सामान काढण्यासाठी खुर्चीतून एका बाजूला वाकणे टाळा. ह्यामुळे स्नायूंना दुखापत होऊ शकते. तुमच्या पायाचे तळवे जमिनीला टेकतील अशाच खुर्चीवर बसा.
३) पाठीच्या कण्याच्या मूळ वक्रतेप्रमाणे त्याला व्यवस्थित आधार द्या. खांद्यांवर ताण येऊन देऊ नका. शरीराची वेडीवाकडी हालचाल होऊ देऊ नका.
४) खूप वेळ एकाच स्थितीत बसणे टाळा. थोड्या थोड्या वेळाने आपली स्थिती बदला. शक्य असल्यास वेळोवेळी कामातून विश्रांती घ्या. आपल्या स्नायूंना मजबूत करण्यासाठी नियमितपणे व्यायाम करा.
५) शारीरिक स्थिती सुधारण्यासाठी जर कोणत्या उपकरणाची मदत होणार असेल तर त्याचा अवश्य वापर करा. कामासाठी लागणाऱ्या वस्तूंची नीट मांडणी करा.
डोळ्यांची काळजी कशी घ्याल?
१) संगणकावर लिहिताना त्यावरील अक्षर हे खूप छोटे असून चालणार नाही. त्याने डोळ्यांवर ताण येतो. मोठे अक्षर असलेलीच लिपी वापरा.
२) संगणकाच्या उजेडाची (brightness) पण काळजी घ्या. मोठी स्क्रीन असलेला संगणक वापरा. ३) खोलीतील उजेडसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. अंधारात कामे करणे टाळा. काम आणि कामाचा ताण, कंटाळा, कामाबद्दलचे असमाधान, चिंता ह्यांमुळेसुद्धा आजारांचा धोका संभवतो. तसेच कामाच्या वेळा, तिथले वातावरण ह्या गोष्टींचा कामावर परिणाम होतो. त्यामुळे कामात चुका होणे, चुकीचे निर्णय घेतले जाणे, इत्यादी गोष्टींसुद्धा घडतात. मानसिक ताणामुळे स्नायूंवरील ताणसुद्धा वाढतो आणि त्यामुळे कार्यक्षमता कमी होते. आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा, आपण जिथे कामाला बसतो त्या जागेचा, आपल्या कामावर नक्कीच परिणाम होत असतो. घरी आपल्याला काही गोष्टींमध्ये हेतूपूर्वक बदल करावा लागतो. कामासाठी बसताना घरात कार्यालयाप्रमाणे वातावरणनिर्मिती करून बसा. यामुळे कामात अधिक लक्ष लागते. हे छोटे छोटे बदल केल्याने शारीरिक स्थिती सुधारायलाही नक्कीच मदत होते. अशाप्रकारे योग्य सवयी आत्मसात करा आणि दुखण्यांपासून लांब राहा.
(लेखिका फिजिओथेरपिस्ट आहेत.)