तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये होणारी विकासकामे ही दर्जेदार पद्धतीची व्हावीत कामे करणा-या ठेकेदारांनी कामांमध्ये हलगर्जीपणा करू नये, असा सल्ला पंचायत समिती सभापती संजय गवारी यांनी दिला.आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील आदिवासी भागातील अत्यंत डोंगर द-याखो-यांमध्ये असणा-या मेघोली येथे राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून २७ लाख ५५ हजार ९३४ रुपये खर्च करून बांधण्यात येणा-या साकव (पूल) चे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी गवारी बोलत होते.
यावेळी माजी आदिवासी जनतेचे नेते सुभाष मोरमारे, जिल्हा परिषद सदस्या रूपाली जगदाळे, पंचायत समिती सदस्या इंदू लोहकरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवराम कोकाटे, माजी संचालक मारुती केंगले, सरपंच दिंगाबर भोईर, उपसंरपंच अमोल दाते, ग्रा. पं. सदस्य शंकर धराडे ग्रामसेवक मंगेश केंगले आदी होते.
संजय गवारी म्हणाले, आदिवासी भागातील गावागावामध्ये विकासकामे होताना ती कामे चांगल्या प्रकारची व दर्जेदार पद्धतीची झाली पाहिजे स्थानिक ग्रामस्थांनी चाललेल्या कामांकडे जातीने लक्ष देऊन संबंधित ठेकेदारांकडून चांगल्या पद्धतीची कामे करून घ्यावीत. त्याचप्रमाणे ठेकेदारांनी कामे करताना कामामध्ये कोणत्याही प्रकारची कुचराई होता कामा नये, असे सांगितले.
सुभाषराव मोरमारे म्हणाले की, या पुलामुळे मेघोली, पोटेवाडी काळवाडी परिसरातील नागरिकांना पावसाळ्यात जा-ये करण्यासाठी उपयोग होणार आहे. तर शाळकरी मुले व वृद्ध यांना ओढ्यातून होणारी धोकादायक प्रवासी वाहतूक टळणार असून सुरक्षित ये-जा करत दळणवळणाची सोय होणार आहे.
मेघोली येथे साकवचे भूमिपूजन करताना सुभाष मोरमारे, रूपाली जगदाळे, संजय गवारी.
०३ तळेघर