पुण्यात इमारतीचं बांधकाम सुरु असताना मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकला मजूर; २ तासाच्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात यश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 06:30 PM2021-09-22T18:30:32+5:302021-09-22T18:30:40+5:30
दुपारी नूतनीकरणांच काम सुरु असताना अचानक मातीचा ढिगारा कोसळल्यानं मजूर मातीखाली दाबला गेला
पुणे : कल्याणीनगर येथे इमारत नूतनीकरणाचं काम सुरु असताना अचानक मातीचा ढिगारा कोसळल्याने एक मजूर अडकला होता. मजुराला तब्बल दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. अग्निशमन दलास कळविताच येरवडा अग्निशमन केंद्रातील वाहनचालक गणेश पराते, जवान वसंत कड, सुनिल खराबी, रतन राऊत यांनी तातडीनं मातीत अडकलेल्या मजूराची सुटका केली आहे.
अग्निशामक विभागाच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणीनगर येथील सुग्रा टेरेस येथे इमारतीच्या नूतनीकरणाचे काम दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सुरु होते. तेव्हा तिथे ७ ते ८ मजुर काम करीत होते. काही समजण्याच्या आत अचानक मातीचा ढिगारा कोसळला. तेवढ्यात सर्व मजूर पळत सुटले. पण त्यांच्यापैकी एकजण मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेला.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक विभागाच्या अधिकारी काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर ढिगारा बाजूला करण्याचे काम सुरू केले. माती बाजूला करायला तब्बल दोन तास लागले. त्यानंतर त्या मजुराला रुग्णवाहिकेतून रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची तब्येत चांगली आहे, अशी माहिती अधिकार्यांनी दिली.