world doctors day : पुण्यात डॉक्टरांनी लिहिले पेशंटला पत्र (व्हिडीओ)
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 04:56 PM2019-07-01T16:56:34+5:302019-07-01T16:59:57+5:30
समाजासाठी अत्यंत महत्वाचा घटक असणारा हा व्यावसायिक व समाज यांच्यातील नाते पुन्हा एकदा सशक्त करण्याची गरज आहे. आणि याच कारणाकरिता बाणेर बालेवाडी असोसिएशनने एक नवा व्हिडीओ तयार केला आहे.
पुणे : आज वर्ल्ड डॉक्टर डे. एकेकाळी जीवदान देणाऱ्या वैद्यकीय क्षेत्राविषयी हल्ली प्रचंड असुरक्षितता निर्माण झाली आहे. डॉक्टरांचा बदलता दृष्टिकोन आणि रुग्णांचा त्यावर तात्काळ येणारा नकारात्मक प्रतिसाद यामुळे या नात्यात मोठा बदल झाला आहे. पूर्वी कुटुंबातील सदस्यासारखा मिळणारा मान आता डॉक्टरला दिला जात नाही. डॉक्टरांवरचे हल्ले वाढत आहेत तसेच रुग्णाचा खर्चही अधिक होत चालला आहे. मात्र समाजासाठी अत्यंत महत्वाचा घटक असणारा हा व्यावसायिक व समाज यांच्यातील नाते पुन्हा एकदा सशक्त करण्याची गरज आहे. आणि याच कारणाकरिता बाणेर बालेवाडी असोसिएशनने एक नवा व्हिडीओ तयार केला आहे.
या व्हिडिओत सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय का'च्या धर्तीवर आधारित गाणे तयार करण्यात आले आहे. त्यात 'पेशंट तुझा डॉक्टरवर भरोसा नाय काय' असे शब्द वापरण्यात आले आहेत. या व्हिडिओच्या शेवटी पेशंटला पत्रही लिहिण्यात आले आहे. हे पत्र डॉ सुषमा प्रशांत जाधव यांनी लिहिले असून डॉ राजेश देशपांडे यांनी त्याचे वाचन केले आहे. या पत्रात डॉक्टरांवर होणाऱ्या शारीरिक हल्ल्यांवर भाष्य करण्यात आले आहे. जर डॉक्टरांवर मोठ्या प्रमाणात हल्ले झाले तर त्यांना नीट सेवा करता येणार नाही असेही त्यात म्हटले आहे. ते पत्र पुढीलप्रमाणे आहे :
डियर पेशंट,
मानवाचं शरीर म्हणजे देव या निष्णात निर्मात्याने बनवलेलं मशीन आणि डॉक्टर म्हणजे त्याची काळजी घेणारा एक कुशल कारागीर. प्रत्येक रुग्ण आपल्या उपचाराने बरा व्हावा असंच डॉक्टरला मनापासून वाटतं. कारण यापेक्षा मोठं आत्मिक सुख त्याच्यासाठी असूच शकत नाही. मात्र कधीकधी नियती तिचा डाव टाकते. त्यावेळी तुझा आक्रोश, तुझा राग समजतो मला, पण तुझा उठणारा हात कदापिही मान्य नाही. मला काळजी वाटते ती इतकीच, की अशा सावटाखाली सेवेचं हे झाड पुरेसं फुलणार नाही.