पुणे: ‘देवीचा जागर केवळ नऊ दिवस करू नका, तर वर्षभर करावा आणि आम्हा महिलांशी चांगलं वागा. वर्षभर आम्हाला तुमची माणुसकी दिसू द्या,’ अशी अपेक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.
पुणे नवरात्र महोत्सवाचे उद्घाटन खा. सुळे यांच्या हस्ते रविवारी गणेश कला क्रीडा मंच येथे झाले. या वेळी माजी आमदार उल्हास पवार, महोत्सवाचे संयोजक आबा बागूल, जयश्री बागूल, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, आमदार रवींद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी, रमेश बागवे, अरविंद शिंदे, प्रशांत जगताप आदी उपस्थित होते.
जीवनगौरव पुरस्काराने उद्योजक संजय मालपाणी, वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. अस्मिता जगताप, ज्येष्ठ पत्रकार स्वागत थोरात, लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. गणेश चंदनशिवे, नृत्यांगना रूपाली जाधव, दीपाली जाधव, उद्योजक शिरीष बोधनी, युवा उद्योजक म्हणून नितीन अग्रवाल यांना सन्मानित करण्यात आले.
सुळे म्हणाल्या, शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, पण मी थेट सर्वोच्च न्यायालयाची पायरी चढली. तेव्हा काॅंग्रेसचे वकील आमच्या सोबत होते. नियतीच्या मनात काय आहे, माहिती नाही. सर्व फिरून फिरून महाविकास आघाडीच्या घडामोडी येत आहेत. काही दिवसांपूर्वी आम्हाला संसदेत बोलावले गेले. नवीन संसदेत आम्ही गेलो. तेव्हा वाईट वाटलं. कारण जुन्या संसदेत खूप आठवणी आहेत. तिथे ऐतिहासिक महत्त्व आहे. तिथल्या भिंती आमच्याशी बोलतात. मी मतदारांमुळे अठरा वर्षे संसदेत काम करतेय. त्यामुळे ते सर्व आठवतंय.’