पुणे : देशात चुकीचे नेतृत्व असल्याने सध्याच्या वातावरणात काहीही घडू शकते. हे नेतृत्व देशात चुकीचा विचार मांडत आहे. स्वातंत्र्य मिळवताना पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस, मौलाना आझाद यांच्यासारख्या नेत्यांनी सर्व जाती, धर्माच्या लोकांना एकत्र आणत इंग्रजांना देश सोडून जाण्यास भाग पाडले. त्याचप्रमाणे आपल्याला देशबांधवांमध्ये द्वेष निर्माण करण्यांविरोधात एक व्हायला हवे आणि त्यांना धडा शिकवावा लागेल, त्यांच्या विरोधात आपण उभे राहायला हवे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे कोंढवा येथे आयोजित ईदमिलन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार अमोल कोल्हे, वंदना चव्हाण, आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, पी. ए. इनामदार, मौलाना अय्युब अशरफी, पंकज महाराज गावडे, तसेच बौद्ध, ख्रिस्ती धर्मगुरु, स्थानिक नगरसेवक उपस्थित होते.
पवार म्हणाले, देशात विविधतेत एक सौंदर्य आहे. हे सौंदर्य उठून दिसायचे असल्यास या विविधतेच्या वेलीवरील सर्व फुलांचा सन्मान केला पाहिजे. पण जगभर सध्या विचित्र स्थिती आहे. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर त्यांना मानवतेचे स्मरण राहिले नाही. आपल्या शेजारील देशांमध्येही हीच स्थिती आहे. शांतताप्रिय असलेल्या श्रीलंकेत सामान्यांना संघर्ष करावा लागत आहे. या संघर्षात आता तेथील राज्यकर्त्यांना भूमिगत होण्याची वेळ आली आहे. पाकिस्तानातील लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या पंतप्रधानांना पायउतार व्हावे लागले. पाकिस्तानातील राज्यकर्त्यांना केवळ भारतद्वेषाचे राजकारण करावे लागते. मात्र, तेथील सामान्य नागरिक भारतीयांच्या विरोधात नाही, तेथील लोक भारतीयांना प्रेम देतात याचा मी अनुभव घेतला आहे. त्यामुळे देशातही असे बंधूभावाचे वातावरण पुन्हा निर्माण करावे लागेल. जात, धर्म बाजूला सारून माणसांत संघर्ष होणार नाही याची खात्री करावी लागेल.
कोल्हे म्हणाले, हैदराबादचा एक नेता औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन अभिवादन करतो. ज्याने स्वत:च्या वडिलांना, भावाला ठार मारले, असंख्य नागरिकांना कंठस्नान घातले अशा औरंगजेबाचे उदात्तीकरण का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक मुस्लिम होते. त्यांनी सर्वांना एकत्र करत रयतेचे राज्य आणले. यावेळी मौलाना अय्युब अशरफी व पंकज महाराज गावडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रशांत जगताप यांनी प्रास्ताविक केले.