पुणे : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेतल्या जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, राज्यातील दहावी-बारावीच्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेता या परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेणे शक्य नाही, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार दहावीची परीक्षा येत्या २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत, तर बारावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत होणार आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे परीक्षा कोणत्या पध्दतीने घेतल्या जाणार याबाबत शिक्षणवर्तुळात उलट-सुलट चर्चा केली जात आहे.
वाढल्या रुग्णसंख्येमुळे पुण्यासह राज्यातील काही जिल्ह्यांत शाळा-महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांच्या परीक्षा नियोजित वेळेत घेणे शक्य होईल का? ऑफलाईनऐवजी ऑनलाईन पध्दतीने परीक्षा शक्य आहे का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. परंतु, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या सुमारे २५ लाखांहून अधिक आहे. एवढी मोठी विद्यार्थी संख्या असल्याने ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेता येणे शक्य नसल्याचे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
---
सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी परीक्षेस आणखी दोन महिने बाकी आहेत. तसेच राज्यातील दहावी-बारावीच्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेणे शक्य नाही. तसेच सध्या राज्य मंडळाचा ऑनलाईन परीक्षेचा कोणताही विचार नाही.
- दिनकर पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ