अख्खं एक वर्ष सरलं, उंबरठे झिजवले; मात्र अद्यापही शासनाचे १५ हजार 'वेटिंग मोड'वरच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 08:21 PM2020-09-24T20:21:54+5:302020-09-24T20:22:38+5:30
ज्येष्ठ नागरिकांना हिनतेची वागणूक : प्रशासकीय असंवेदनशीलता येतेय आडवी
पुणे : शहरात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरानंतर शासनाने जाहीर केलेली अवघी १५ हजारांची मदत मिळविण्यासाठी शेकडो ज्येष्ठ नागरिकांना अद्यापही मामलेदार कचेरीमधील हवेली तहसीलदार कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.येथील अधिकारी तीन-तीन तास या ज्येष्ठांना कार्यालयाबाहेर बसवून ठेवतात पण भेटत नाहीत. पुरग्रस्त नागरिकांच्या भळभळत्या जखमांवरील खपली काढण्याचा असंवेदनशील प्रकार घडत आहे. याकडे तहसीलदार कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे.
गेल्या वर्षी 25 सप्टेंबर रोजी अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे उध्वस्त झालेल्या घरांचे सांगाडे अद्यापही तसेच उभे आहेत. अनेकांचे संसार अद्यापही उभे राहू शकलेले नाहीत. कोणी आपला भाऊ गमावला तर कोणी पत्नी, कोणी मुलगा गमावला तर कोणी आई वडील. पुराला एक वर्ष झाल्यानंतरही अनेकांना आपल्या हक्कासाठी झगडावे लागत आहे. सातारा रस्त्यावरील गुरुराज सोसायटीमधील 33 कुटुंबांना अद्यापही मदत मिळालेली नाही. पुराच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी नेमलेल्या कर्मचारी-अधिकाऱ्यांनी पंचनाम्याच्या प्रती उशिरा दाखल केल्यामुळे या कुटुंबांना अद्यापही मदत मिळू शकलेली नाही. प्रशासकीय दिरंगाईचे खापर रहिवाशांवर फोडून यंत्रणा मोकळी झाली आहे.
गेले वर्षभर सतत पाठपुरावा करुनही या नागरिकांच्या हाती काहीही पडलेले नाही. घरांसह घरामधील संसारोपयोगी वस्तूंचे लाखो रुपयांचे झालेले नुकसान शासनाच्या पंधरा हजारांनी भरुन निघणारे नाही. परंतू, बुडत्याला काडीचा आधार या उक्तीप्रमाणे काहीतरी हातभार नक्कीच मिळाला असता. या 33 जणांमध्ये बहुतांश वयोवृद्ध मध्यमवर्गीय नागरिक आहेत. त्यांच्याबाजूने आवाज उठविणारे कोणीही नाही. गेले वर्षभर हे नागरिक हवेली तहसीलदार कार्यालयात जाऊन चकरा मारत आहेत. परंतू, तेथील एकही अधिकारी त्यांना समाधानकारक उत्तर देत नाही. लेखनिकापासून वरिष्ठ अधिका-यापर्यंत सर्वजण उद्धट भाषेत आणि अरेरावीने या ज्येष्ठांशी बोलतात. कोणी धड माहितीही देत नाही.
यासंदर्भात प्रांताधिका-यांचीही नागरिकांनी भेट घेतली. परंतू, त्यांच्याकडूनही पुन्हा तहसीलदार कार्यालयाकडेच बोट दाखविण्यात आले. काही जणांच्या नावाचे तर दोन दोन धनादेश निघाले. परंतू, गरजवंतांना अद्याप एकही धनादेश मिळाला नसल्याचे समोर आले आहे. निदान या वर्षात तरी मदत मिळेल अशी आशा हे नागरिक व्यक्त करीत आहेत.