पोलिसांच्या हलगर्जीपणाने कैदी पळाला; उपनिरीक्षकासहीत ५ कर्मचारी निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 05:47 PM2021-06-20T17:47:22+5:302021-06-20T18:46:40+5:30
कैद्याला मुलीच्या लग्नात उपस्थित राहणार्यासाठी उत्तर प्रदेशात नेले असताना तो राहत्या घरातून पळून गेला
पुणे: येरवडा कारागृहातील कैद्याला मुलीच्या लग्नात उपस्थित राहणार्यासाठी उत्तर प्रदेशात नेले असताना कैदी पळून गेल्याने पोलीस उपनिरीक्षकासह ५ जणांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक सचिन निंबाळकर, पोलीस हवालदार बाळु मुरकुटे, कर्मचारी शरद मोकाते, महावीर सामसे, किशोर नेवसे अशी निलंबित करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अपर पोलीस आयुकत जालिंदर सुपेकर यांनी आदेश काढला आहे.
वेदप्रकाशसिंग विरेंद्रकुमार सिंग (रा. मु़ पो़ गोलवरा, जि़ सुलतानपूर, उत्तर प्रदेश) असे पळून गेलेल्या कैद्याचे नाव आहे.
वेदप्रकाशसिंग हा येरवडा कारागृहात एका गुन्ह्यात शिक्षा भोगत आहे. मुलीच्या लग्नासाठी त्याला त्याच्या मुळगावी गोलवारा येथे उपस्थित राहण्यासाठी कारागृह उपमहानिरीक्षक यांनी ७ दिवसांची अभिवचन रजा मंजूर केली होती. त्यानुसार वेदप्रकाशसिंग याला लग्नकार्यास हजर ठेवण्यासाठी कारागृहाकडून आरोपी पार्टीची मागणी करण्यात आली होती. पोलीस उपनिरीक्षक सचिन निंबाळकर यांच्यासह पाच जणांची त्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. तशी ऑर्डर १० मेला काढण्यात आली. आरोपी पार्टी कैद्याला घेऊन त्याच्या मुळ गावी गेले होते. १५ मे रोजी पहाटे ५ ते ६ वाजण्याच्या दरम्यान कैदी वेदप्रकाशसिंग हा राहत्या घराच्या खिडकीच्या लोखंडी गजाचे स्क्रु काढून बाहेर असलेली जाळी कापून खिडकीमधून पळून गेला.
याबाबत केलेल्या प्राथमिक विभागीय चौकशीत आरोपी पार्टीने केलेल्या बेजबाबदार व हलगर्जीपणामुळे कैद्याने पलायन केल्याचे समोर आले. ही बाब पोलीस दलाच्या शिस्तीच्या दृष्टीकोनातून गंभीर आहे. कर्तव्यात गंभीर चूक केल्यामुळे पोलीस दलाची जनमानसात प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका ठेवत ५ जणांना निलंबित करण्यात आले आहे.