होय, आमचा गणपती नवसाचाच! हुतात्मा बाबू गेनू मंडळ ट्रस्टचा स्पष्ट उल्लेख
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 11:51 AM2019-09-05T11:51:00+5:302019-09-05T11:57:39+5:30
‘नवसाचा गणपती’ असा उल्लेख आतापर्यंत छातीठोकपणे करता येत होता. परंतु, आता हा उल्लेख कायदेशीररीत्या अडचणीचा ठरू शकतो.
नीलेश राऊत-
पुणे : ‘नवसाला पावणारा देव,’ असे म्हणण्याची बंदी नव्या कायद्याने घातली आहे. तरीही पुण्यातील हुतात्मा बाबू गेनू मंडळाचा गणपती ‘नवसाचा गणपती’ म्हणूनच ओळखला जात आहे. कायदेभंग होण्याची धास्ती या मंडळाला नसल्याने त्यांनी त्यांच्या वार्षिक अहवालावरही ‘नवसाचा गणपती’ असा उल्लेख ठळकपणे केला आहे.
‘नवसाच्या’ या गणपतीची कथा रंजक आहे. या मंडळाच्या गणेशमूर्तीचे काम चालू होते. धडापर्यंत मूर्ती तयार झाली आणि त्याचवेळी मूर्तिकाराचा अकाली मृत्यू झाला़. मग, प्रश्न असा निर्माण झाला, की उर्वरित मूर्तीचे काम पूर्ण होणार की नाही? मंडळाचे कार्यकर्ते चिंतेत पडले. ही गोष्ट आहे सन ४८ वर्षांपूर्वीची. त्यावेळी मूर्ती पूर्ण व्हावी, असा नवस त्यावेळचे कार्यकर्ते बोलले. काही दिवसांतच मंडळाला हवी तशी मूर्ती साकार झाली. म्हणून गणपतीचे नावच झाले ते ‘नवसाचा गणपती.’
‘नवसाचा गणपती’ असा उल्लेख आतापर्यंत छातीठोकपणे करता येत होता. परंतु, आता हा उल्लेख कायदेशीररीत्या अडचणीचा ठरू शकतो. यासंदर्भात हुतात्मा बाबू गेनू मंडळ ट्रस्टच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडे ‘लोकमत’ने विचारणा केली. मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे म्हणाले, ‘‘कर्तृत्वाला परमेश्वराची जोड हे आमचे ब्रीद आहे. आम्ही कुठेही अंधश्रद्धेला पाठिंबा देत नाही. आमच्या गणपतीला नवस करा आणि फेडण्यास या, असे आम्ही कधीही कोणाला सांगत नाही़ ‘हुतात्मा बाबू गेनू मंडळ ट्रस्टचा नवसाचा गणपती’ या नावानेच आमच्या मंडळाची नोंदणी शासनदरबारी सन २००४ मध्ये झालेली आहे.’’
मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि कार्याध्यक्ष किशोर दाभाडे म्हणाले, की सन १९७० मध्ये मंडळाची स्थापना झाली़ त्यावेळी प्रारंभीची दोन वर्षे नवीन मूर्ती स्थापन केली जात होती़. ही मूर्तिकार खेडेकर यांनी ती तयार केली होती.परंतु ती जड असल्याने, १९७३ मध्ये मंडळाने कायमस्वरूपी दुसरी मूर्ती तयार करण्याचे ठरविले़. त्या काळी सातशे रुपयांची वर्गणी हातात असताना आम्ही एकवीसशे रुपयांची मूर्ती साकारण्याचा संकल्प केला़. मूर्तिकार अनंतराव वाईकरांकडून ही मूर्ती साकारण्यास सुरुवात झाली़. पण धडापर्यंत मूर्ती तयार झाली आणि वाईकर यांचे अकाली निधन झाले़. मूर्तीचे पुढचे काम पूर्ण व्हावे, यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणरायालाच मूर्ती साकार होण्याकरिता नवस
केला होता़. पुढे मूर्तिकार प्रकाश गोसावी यांनी अवघ्या काही दिवसांतच अपूर्ण मूर्तीचे मुख साकारले आणि आमच्या मनातील मूर्ती पूर्णत्व:ला आली़. त्या अर्थाने आम्हा कार्यकर्त्यांच्या नवसाचा हा गणपती असल्याने गणपतीचे नावच ‘नवसाचा गणपती’ आहे. आम्ही तसे म्हणतो आणि म्हणणारच़.