कांद्याची आवक तिपटीने वाढली
By admin | Published: December 26, 2016 03:21 AM2016-12-26T03:21:23+5:302016-12-26T03:21:23+5:30
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक तीन पटीने वाढून भावातही किंचित वाढ
चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक तीन पटीने वाढून भावातही किंचित वाढ झाली आहे. ही आवक ८२१ क्विंटलने वाढली आहे. तर बटाट्याच्या भावात घसरण झाली आहे. गवार, भेंडी व शेवगा तेजीत असून, टोमॅटो, कोबी, फ्लॉवरचे भाव गडगडले असून, २ व ३ रुपये किलोने विक्री होत आहे. माल पडून राहात असल्याने शेतकरी चिंतेत आहे. येथील बाजारात गेल्या तीन महिन्यांपासून जळगाव भुईमूग शेंगा व बंदूक भुईमूग शेंगा यांची काहीच आवक झाली नाही. एकूण उलाढाल २ कोटी २० लाख रुपये झाली असून, ही उलाढाल ६५ लाखांनी वाढली असल्याची माहिती सभापती नवनाथ होले व सचिव सतीश चांभारे यांनी दिली.
कांद्याला या आठवड्यात ५०० ते १००० रुपये असा प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल भाव मिळाला. चाकणमध्ये कांद्याची आवक तिपटीने वाढूनही भावात किंचित वाढ झाली आहे. कांद्याचा कमाल भाव ९५० रुपयांवरून १००० रुपयांवर स्थिरावला. जनावरांच्या बाजारात जर्शी गाई, बैल यांच्या विक्रीत घट झाली असून म्हैस व शेळ्या-मेंढ्यांच्या विक्रीत वाढ झाली आहे.
येथील मार्केट यार्डमध्ये कांद्याची एकूण आवक १२२१ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ८२१ क्विंटलने वाढूनही भावात ५० रुपयांची वाढ झाली. कांद्याचा कमाल भाव ९५० रुपयांवरून १००० रुपयांवर स्थिरावला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक १०७५ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक २५ क्विंटलने वाढून भावात १०० रुपयांची वाढ झाली. बटाट्याचा कमाल भाव ६०० रुपयांवरून ७०० रुपयांवर स्थिरावला. लसणाची एकूण आवक ४ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक स्थिर राहूनही कमाल भाव ११०० रुपयांवर स्थिरावला.
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजगुरुनगर येथील पालेभाज्यांच्या बाजारात ३ लाख जुड्या मेथीची आवक झाली, तर २ लाख ५० हजार जुड्या कोथिंबिरीची आवक झाली. शेलपिंपळगाव आवारात मेथीची २९ हजार जुड्या, तर कोथिंबिरीची ३८ हजार जुड्या, आणि शेपूची १ हजार जुड्यांची आवक झाली. चाकणला हिरव्या मिरचीची एकूण आवक ४१० पोती झाली असून, मिरचीला १००० ते १५०० रुपये असा भाव मिळाला.