पुणे : हडपसर येथील व्यावसायिकाकडे ५ लाखाच्या खंडणीची मागणी करणाऱ्या माजी पत्रकार शिरसाठ विरुद्ध हडपसर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी हडपसर परिसरातील हिंगणेआळी येथे राहणाऱ्या एका ३२ वर्षाच्या व्यावसायिकाने हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार हडपसर येथील माळवाडी रोडवरील कुमार पिका सोसायटी येथे गुरुवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला.
फिर्यादी याचे गांधी चौकात दुकान आहे.त्यांच्या दुकानातील सिगारेट, बडीशेप, बिडी, गोळ्या असा माल चालक टेम्पोतून घेऊन जात होता. पत्रकार म्हणविणाऱ्या शिरसाट याने टेम्पो अडविला. टेम्पोची चावी काढून घेतली. हे त्यांच्या टेम्पो चालकाने फिर्यादींना सांगितले. त्यांना फोन करुन तुम्ही तुमच्या टेम्पोमध्ये सिगारेट, बिडी विकत असता, तुम्ही मला ५ लाख रुपये द्या. तुम्ही ५ लाख रुपये दिले नाही तर तुम्हाला जड जाईल, तुमच्यावर केस करावी लागेल.
तुम्हाला ५ लाख रुपये द्यावेच लागेल, अशी मागणी केली व फोन ठेवून दिला. त्यानंतर टेम्पोचालकाने चावी मागितल्यावर शिरसाट याने त्याला खलास करण्याची धमकी देऊन डोक्यात काचेची बाटली मारुन जखमी केले. टेम्पोची पुढील काच फोडली. हे समजल्यावर त्यांनी चालकाला हडपसर पोलीस ठाण्यात बोलावले. तेथून त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. हडपसर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.पत्रकार शिरसाठ याचे फिर्यादी यांच्याबरोबर फोनवरील संभाषणाचे रेकॉर्डिंग पोलिसांनी हस्तगत केले आहे. हडपसर पोलीस अधिक तपास करीत आहेत.