चित्रपटात ‘हिरो’ व्हायला निघालेला अल्पवयीन मुलगा सापडला दौंडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 07:00 PM2018-05-24T19:00:43+5:302018-05-24T19:00:43+5:30
लहान मुलांना चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरविषयी प्रचंड कुतुहल आहे. काही मुले त्याच ग्लॅमरला भूलुन आयुष्यात टोकाची पावले उचलतात आणि आयुष्य उध्वस्त करून घेतात.
दौंड : चित्रपटामध्ये काम करण्याचे स्वप्न उराशी बाळगत कितीतरी मुले यांना घर सोडून आलेले सुपरस्टार म्हणून झळकतात. त्याच सुपरस्टारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत मग काही अल्पवयीन मुले पुढचा मागचा कोणताही विचार न करता घरदार सोडतात. यातून काही मुलांच्या आयुष्याची राखरांगोळी झालेली उदाहरणे देखील कमी नाही. तसाच एक मुलगा हरियाणातून चित्रपटसृष्टीत हिरो होण्यासाठी गोव्याला निघाला होता. मात्र, वेळीच मिळालेल्या माहितीवरुन त्याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक देवसिंह बाविस्कर यांनी दिली.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या मुलाचे नाव रतन रामवीर कागडा (वय १५ ) आहे. रेल्वे पोलीस श्रद्धा पठारे, आनंद वाघमारे , संतोष कांबळे , दत्ताञय खोत , हर्षल तोरणे हे रेल्वे स्थानकात गस्त घालत होते. त्यांना हा मुलगा रेल्वे फलाटावर दिसला. हा मुलगा एकटाच असल्याने पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याने नाव पत्ता सांगितला. दरम्यान, त्याने हरियाणा येथून दिल्लीला आल्याचे आणि दिल्लीवरुन गोवा एक्सप्रेसने गोव्याला हिरो बनण्यासाठी निघालो असल्याचे पोलिसांना सांगितले. या मुलाजवळ स्वत: चा मोबाईल नव्हता. मात्र, त्याला वडिलांचा मोबाईल नंबर तोंडपाठ होता. त्यावरुन पोलिसांनी त्याच्या वडिलांशी संपर्क साधला.
लहान मुलांना चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरविषयी प्रचंड कुतुहल आहे. काही मुले तर त्याला भूलुन अगदी टोकाचे पावले देखील उचलतात. परंतु, याताून काही मुले स्वत:हून चुकीच्या मार्गाला लागतात किंवा लावलेही जातात. या वयात त्यांच्या अल्पवयीन बुध्दीला भविष्यात त्यांच्यासोबत घडणाऱ्या घटनांच्या दुष्परिणामांची दाहकता समजत नाही. आणि ते बिनधास्तपणे आई वडिलांसह कुटुंब, शिक्षण यांचा विचार न करता घर सोडतात. आपल्या पाल्याच्या अशा वागण्यामुळे पालक मोठ्या प्रमाणावर अस्वस्थ आहे.
रतनचे वडील रामवीर कागडा हे ट्रान्सपोर्ट निरीक्षक आहेत. त्यांनी रतन हरवल्याची तक्रार फतेहाबाद पोलीस ठाण्यात दाखल केली होती. दौंड रेल्वे पोलिसांनी मुलगा सापडल्याची माहिती फतेहाबाद पोलिसांना कळवली. फतेहाबाद पोलीस आणि सापडलेल्या मुलाचे वडील रामवीर हे दौंडला आले. पोलिसांनी लोहमार्ग पोलीस अधिक्षक डॉ. प्रभाकर बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली कायदेशीर बाबी पूर्ण करुन रतनला ताब्यात देण्यात आले. त्याच्या वडिलांनी लोहमार्ग पोलिसांचे आभार मानले.