पत्नी अन् सासुच्या त्रासामुळे तरुणाची आत्महत्या; मृत्युपूर्वी केला व्हिडिओ रेकॉर्ड, पुण्यातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 01:50 PM2021-09-14T13:50:08+5:302021-09-14T13:50:16+5:30
लग्न झाल्यापासून पत्नी व सासु यांनी त्याला शिवीगाळ करुन सतत भांडणे करुन त्याला मानसिक त्रास दिला.
पुणे : लग्न झाल्यापासून वेगळे राहण्यासाठी आणि बाहेर नोकरी करावयाची या कारणावरुन पत्नी आणि सासुकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मोबाईलवर या तरुणाने व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. .
रोहित सुनिल पवार (रा. माई हाईटस, कदमवाकवस्ती, लोणी स्टेशन) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना १० ऑगस्ट २०२१ रोजी घडली होती. याप्रकरणी सुनिल रघुनाथ पवार (वय ५८, रा. माई हाईटस, लोणी स्टेशन) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन रोहित पवार याची पत्नी रश्मी रोहित पवार (वय २६) आणि सासु लता राजेश चव्हाण (वय ४६, दोघी रा. रामटेकडी, हडपसर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित आणि रश्मी यांचा २० नोव्हेंबर २०१६ रोजी विवाह झाला होता. लग्न झाल्यापासून वेगळे राहण्याचे कारणावरुन रश्मी रोहितशी भांडणे करत होती. तसेच बाहेर नोकरी करावयाची आहे, म्हणून व घरातील कोणाशीच बोलायचे नाही, या कारणावरुन पत्नी व सासु यांनी त्याला शिवीगाळ करुन सतत भांडणे करुन त्याला मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून रोहित याने १० ऑगस्ट रोजी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक व्हिडिओ रेकॉर्ड करुन ठेवला होता. त्यामध्ये ‘‘मी माझे जीवाचे बरे वाईट करीत असून त्यात जबाबदार माझी पत्नी व सासु आहे,’’ असे त्यात म्हटले आहे. त्याच्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ आढळून आल्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक शेंडगे अधिक तपास करीत आहेत़.