पुणे : मैत्री करण्यासाठी १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा भर रस्त्यात हात पकडून फ्रेंडशीपची मागणी करणार्या तरुणाला तिच्या भावांनी चांगलाच चोप दिला. याप्रकरणी खडक पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. शुभम कैलास दारवटकर (वय २२, रा. शुक्रवार पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एका १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम दारवटकर हा गेल्या दोन आठवड्यापासून एका अल्पवयीन मुलीच्या मागे लागला होता. ती शाळेत जात येत असताना तिच्याशी मैत्री करण्याकरीता मागे मागे येऊन तिच्याकडे टक लावून पहात असे. ही मुलगी शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कस्तुरी चौकातून जात असताना शुभम तिच्या मागे मागे आला. मै तुम से फ्रेंडशीप करना चाहता हू, तूम मुझसे फ्रेंडशीप करो, असे म्हणून भर रस्त्यात तिचा हात पकडला.
या घटनेची माहिती या मुलीच्या भावांना समजली. तेव्हा त्यांनी शुभम याचा शोध घेत दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गुरुवार पेठेतील झुंजार मित्र मंडळासमोर तिघांनी त्याला गाठले. हाताने, लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करून जखमी केले. खडक पोलिसांनी शुभम याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. तर, शुभम दारवटकर याच्या फिर्यादीवरुन तिघाविरुद्ध मारामारी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.